एकेरी वाहतूक सुरू मग रस्ता का खुला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:14 AM2018-04-14T00:14:03+5:302018-04-14T00:14:03+5:30
टिळकवाडीतून पंडित कॉलनीकडे व पुढे ठाकरे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूकबंदी शहर वाहतूक पोलिसांनी लादली असली व ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे वाहने नेण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आलेला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला का? असा सवाल पंडित कॉलनीतील रस्ता बंदीमुळे त्रस्त रहिवासी विचारू लागले आहेत.
नाशिक : टिळकवाडीतून पंडित कॉलनीकडे व पुढे ठाकरे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूकबंदी शहर वाहतूक पोलिसांनी लादली असली व ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे वाहने नेण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आलेला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला का? असा सवाल पंडित कॉलनीतील रस्ता बंदीमुळे त्रस्त रहिवासी विचारू लागले आहेत. एकतर्फी रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम तर झालाच, परंतु रहिवाशांनाही घर गाठण्या-साठी इंधन वाया घालवावे लागत आहे. पंडित कॉलनीत दोन रुग्णालये असून, त्यांची वाहने जाण्या-येण्यासाठी रस्ता अपुरा पडत असल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे शहर वाहतूक पोलिसांनी ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा तुघलकी एकतर्फी निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांकडूनच या टिळकवाडीच्या चौफुलीवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून, त्याच्या आधारे वाहतुकीवर नियंत्रण मिळविले जात असताना गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी सदरचा रस्ता एकेरी वाहतुकीसाठीच मोकळा करून दुहेरी वाहतूक बंद केली आहे. त्यासाठी पंडित कॉलनीकडे जाणारा रस्ता लोखंडी बॅरिकेड्सने बंद करण्यात आला आहे जेणे करून ठाकरे बंगल्याकडून येणारी वाहने सिग्नल ओलांडून टिळकवाडी वा शरणपूररोडकडे मार्गस्थ होऊ नये अशी व्यवस्था केली आहे.वाहनचालकाला नियमभंग करू द्यायचा व त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रकार वाहतूक पोलिसांकडून केला जात असताना दुसरीकडे याच मार्गावर भर रस्त्यात अनेक चारचाकी वाहने उभी राहात असल्याने या वाहनांमुळे पंडित कॉलनीतील वाहतूक विस्कळीत होत नाही काय, असा सवालही येथील रहिवासी करीत आहेत.
पोलिसांच्या हेतुबद्दल संशय
व्यावसायिक व रहिवाशांनी गजबजलेल्या पंडित कॉलनीतील नागरिकांवर पोलिसांनी हा रस्ता बंदीचा आदेश थोपविला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यामागचा उलगडा येथील रहिवाशांना झालेला नाही. रस्ता जर वाहनांसाठी बंदच आहे तर तो बंद ठेवण्यामागच्या पोलिसांच्या हेतुबद्दल संशय घेतला जात आहे. काही विशिष्ट व्यावसायिकांना या रस्त्याचा वापर करता यावा म्हणून हा रस्ता खुला ठेवण्यात आला की, पोलीस वाहतूक सिग्नलवर नसेल तेव्हा त्याचा गैरफायदा नागरिकांनी घेत या रस्त्याचा वापर करावा, असा त्यामागचा हेतु आहे याचा उलगडा मात्र झालेला नाही.