सिन्नरला ७५ टक्के बेड रिक्त; संक्रमण दर ११ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:50+5:302021-05-28T04:11:50+5:30

शैलेश कर्पे लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर: अवघ्या महिनाभरापूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येपुढे बेड अपुरे पडत होते. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना ...

Sinnar 75% of beds empty; Infection rate at 11 percent | सिन्नरला ७५ टक्के बेड रिक्त; संक्रमण दर ११ टक्क्यांवर

सिन्नरला ७५ टक्के बेड रिक्त; संक्रमण दर ११ टक्क्यांवर

Next

शैलेश कर्पे

लोकमत न्यूज नेटवर्क

सिन्नर: अवघ्या महिनाभरापूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येपुढे बेड अपुरे पडत होते. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागत होती; परंतु मे महिन्यात कोरोनाचा विळखा कमी झाला अन् रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने घसरला. संक्रमण दर ३५ वरून ११ टक्क्यांवर आल्यामुळे आजघडीला ७५ टक्के खाटा रिक्त व व्हेंटिलेटरही उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महिनाभरापूर्वी रोज सिन्नर शहर व तालुक्यात रोज १५० ते २०० रुग्ण वाढत होते. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांसह सिन्नर ग्रामीण व इंडिया बुल्स कोविड सेंटरचे बेड कमी पडत होते; मात्र आता बेड रिकामे राहू लागले आहेत. महिन्यापूर्वी गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटरसाठी शोधाशोध करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत होती. सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आता व्हेंटिलेटरही सहजतेने उपलब्ध होत आहे. कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे; अन्यथा तिसरी लाट त्रासदायक ठरू शकते, अशीही भीती तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने लावलेला लाॅकडाऊन, लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून प्रशासनाने त्याची केलेली कडक अंमलबजावणी यामुळे कोरोना संसर्गाची साखळी खंडित झाली आहे. परिणामी, सिन्नरमधील नवीन कोरोना बाधितांचे आकडे मोठ्या प्रमाणात घटले आहेत. संसर्गाचा दर ३५ टक्क्यांवरून थेट ११ टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. १५ दिवसांपूर्वी शहरातील ९ हॉस्पिटलमधील ३५० बेड फूल होते. त्यामुळे बेडसाठी रुग्णांची धावपळ सुरू होती. अनेकांना बेड न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला; मात्र आता परिस्थिती बदलली असून, आता ३५० पैकी तब्बल २७५ बेड रिकामे आहेत. सर्वसाधारण, ऑक्सिजन आणि मिनी व्हेंटिलेटरचे बेड आता रुग्णांना सहज मिळू लागले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात एकूण १५० बेड असून, त्यापैकी १०० बेड ऑक्सिजनचे आहेत. आता या रुग्णालयात केवळ ५६ रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही ७० टक्‍क्‍यांपर्यंत बेड खाली झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे. सिन्नरकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी फाजील आत्मविश्वास येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्याचे बोलले जात आहे.

इन्फो...

संक्रमण दर ३५ वरून ११ टक्क्यांवर

२१ एप्रिल रोजी २१८ पैकी ६९ जण बाधित असल्याचे रॅपिड अँटिजन टेस्ट केल्यानंतर समोर आले होते. संसर्गाचा दर हा त्यावेळी ३१.६५ टक्के होता. तर आरटीपीसीआर चाचणीत ३५६ पैकी १२७ रुग्ण बाधित निघत होते. म्हणजेच पॉझिटिव्हिटी दर ३५.७७ टक्के होता; मात्र महिनाभरानंतर २१ मे रोजी रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये १०.७५ टक्के तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये केवळ ११.४५ टक्‍के रुग्ण कोरोना बाधित निघाले.

कोट...

टेस्टींग, ट्रेसींग, ट्रीटमेंटला प्राधान्य

कडक लाॅकडाऊन, वाढवलेल्या चाचण्या, तत्काळ उपचार, विलगिकरणावर भर यामुळे कोरोनाचा संसर्ग दर ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे.

- डॉ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर.

कोट...

रुग्ण कमी; पण संकट संपलेले नाही

निर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु रुग्ण कमी झाले म्हणून नागरिकांनी बिनधास्त राहता कामा नये. पालकांनी मुलांची जास्त काळजी घ्यावी. कारण कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन केले पाहिजे. तिसरी लाट येणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहावे.

-डॉ. वर्षा लहाडे, अधीक्षक, सिन्नर ग्रामीण रुग्णालय

इन्फो...

दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढले

सिन्नर तालुक्यात आत्तापर्यंत १२०६० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२८५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सिन्नर नगरपालिका हद्दीत ४४३२ तर ग्रामीण भागात ८४२४ बाधित आढळून आले आहेत. सिन्नर तालुक्यात आतापर्यंत २०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर वाढल्याचे चित्र आहे.

इन्फो...

घटती कोरोनाची रुग्णसंख्या

१५ एप्रिल २०२१

ॲक्टीव्ह रुग्ण-१०४४

---

३० एप्रिल २०२१

ॲक्टिव्ह रुग्ण-१९११

---

७ मे २०२१

ॲक्टिव्ह रुग्ण-१५७४

१४ मे २०२१

रुग्ण-११४२

---

२१ मे २०२१

ॲक्टिव्ह रुग्ण-८०९

२६ मे २०२१

ॲक्टिव्ह रुग्ण- ५९२

सोबत फोटो- २७ सिन्नर ३

सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात बेड रिकामे असून, प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे.

===Photopath===

270521\27nsk_16_27052021_13.jpg

===Caption===

  सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात बेड रिकामे असून प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे.

Web Title: Sinnar 75% of beds empty; Infection rate at 11 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.