सिन्नरला भाजपाकडून, तर नामपूरला कॉँगे्रसकडून ‘शरद पवार’ रिंगणात !
By Admin | Published: February 16, 2017 12:30 AM2017-02-16T00:30:05+5:302017-02-16T00:30:21+5:30
सिन्नरला भाजपाकडून, तर नामपूरला कॉँगे्रसकडून ‘शरद पवार’ रिंगणात !
सिन्नर/नामपूर : नावात काय असते? असे अनेकदा म्हटले जाते. मात्र कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती असे नाव कमवून जाते की त्याची ओळख आणि ते क्षेत्र यांचे नातेच एकमेकांची ओळख बनून जाते. राज्याच्या राजकारणातही काहीसे असेच झाले आहे. महाराष्ट्राचे राजकारण आणि शरद पवार यांचे नाव एकमेकांशी असेच घट्ट जोडले गेले आहे. मात्र निवडणुकीत शरद पवार यांचे नाव भाजपाचे किंवा कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून घेतल्यास अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिक आहे. असाच काहीसा किस्सा सिन्नर आणि सटाण्याच्या राजकारणात अनुभवायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. माळेगाव गणात भाजपाने तर नामपूर गटात कॉँग्रेसने ‘शरद पवार’ नामक उमेदवार रिंगणात उतरविल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.
भाजपाकडून माळेगाव गणात उमेदवारी करीत असलेले शरद लक्ष्मण पवार हे मापारवाडी येथील रहिवासी आहेत. पंधरा वर्षांपासून शरद पवार यांचे कुटुंब माळेगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रीय असल्याने माळेगावकरांना स्थानिक राजकारणातील शरद पवार ज्ञात होते. मात्र आता शरद पवार यांनी थेट भाजपाकडून पंचायत समितीची उमेदवारी केल्याने तालुक्यात ते नावामुळे चर्चेत आले आहेत.
माळेगाव व मापारवाडी अशी ग्रुपग्रामपंचायत आहे. मापारवाडी येथील रहिवासी असलेल्या शरद पवार यांनी माळेगाव ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केले आहे. सलग चारवेळा शरद पवार स्वत: किंवा त्यांच्या पत्नी माळेगाव ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नामसाधर्म्यामुळे मापरवाडीचे पवार यांना गावात ‘मंत्री’ या टोपण नावानेही संबोधले जाते. भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्याने ते आणखीनच चर्चेत आले आहे. माळेगाव गणातून शरद पवार यांची लढत शिवसेनेचे भगवान पथवे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अर्जून बर्डे यांच्याबरोबर होत आहे. तर नामपूर गटात शरद पवार यांची लढत भाजपाचे कनू गायकवाड आणि शिवसेनेचे सोमनाथ सोनवणे यांच्याबरोबर होत आहे. नावामुळे चर्चेत असले तरी पवार यांना इतर पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वार्ताहर)