सिन्नरला कारमधून लांबविले साडेतीन लाख
By admin | Published: July 6, 2017 12:24 AM2017-07-06T00:24:30+5:302017-07-06T00:24:46+5:30
सिन्नरला कारमधून लांबविले साडेतीन लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात लघुशंकेसाठी थांबलेल्या राजेंद्र कोकाटे व कैलास थोरात यांच्या स्विफ्ट कारचा दरवाजा उघडून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये लंपास केल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील जय जनार्दन दूध संकलन केंद्राचे राजेंद्र सीताराम कोकाटे (४९) व त्यांचा मित्र कैलास गंगाधर थोरात यांनी सिन्नर येथील आंध्र बॅँकेच्या शाखेतून तीन लाख रुपये काढल्यानंतर संगमनेर येथे पशुखाद्याचे बिल देण्यासाठी संगमनेरला जात होते. गुरेवाडी शिवारात पेट्रोलपंपाच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर लघुशंकेसाठी थांबले. गाडी लॉक न करता दोघेही रस्त्याच्या खाली उतरून पुढे गेले. त्यानंतर मागे वळून पाहिल्यानंतर अज्ञात मोटारसायकल चोर स्विफ्ट कारपासून सुसाट वेगाने गेल्याचे त्यांनी पाहिले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, उपनिरीक्षक डी.व्ही. आवारे, हवालदार राम भवर, नितीन सांगळे, गौरव सानप, लक्ष्मण बदादे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक डी. व्ही. आवारे अधिक तपास करीत आहे.कारजवळ आल्यानंतर पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचा संशय आल्याने गाडीत मागील शिटवर पिशवीत ठेवलेले साडेतीन लाख रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत दुचाकीस्वार फरार झाले होते.