सिन्नरला कामगार शक्ती फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 06:20 PM2019-07-21T18:20:00+5:302019-07-21T18:20:28+5:30
सिन्नर : कामगार शक्ती फाउंडेशनतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिन्नरचे भूमिपूत्र तथा गुजरातमधील बलसाडचे उपजिल्हाधिकारी रवींद्र खताळे उपस्थित होते. व्यासपीठावर नवजीवन एज्युकेशन संस्थेचे संस्थापक सुभाष देशमुख, सावित्रीबाई पवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. एल. पवार, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू श्रध्दा घुले-खताळे, फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार उपस्थित होते.
दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सुमारे ११८ विद्यार्थी विद्यार्थीनींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चौकस वृत्ती व आकलनक्षमता महत्वाची असते. अवतीभोवती घडणा-या घडामोडींबाबत जागरूक असावे. पाठांतर, घोकंपट्टीऐवजी चौफेर वाचनावर भर द्यावा. मुल्य शिक्षणासह धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक संदर्भ हमखास यश मिळवून देतात, असे प्रतिपादन खताळे यांनी केले. सुभाष देशमुख व डॉ. पवार यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रवींद्र गिरी यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. किरण भावसार यांनी परिचय करून दिला.