सिन्नरला रेमडेसिविरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:14+5:302021-04-20T04:15:14+5:30
सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ८,४८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६,९६५ रुग्ण उपचार करुन बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ...
सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ८,४८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६,९६५ रुग्ण उपचार करुन बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १३५ रुग्ण दगावले असून सुमारे १४०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत सिन्नर तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालय, इंडिया बुल्स, सिध्दिविनायक हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, परमसाई हॉस्पिटल, शिवाई हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, श्री सदगुरू हॉस्पिटल, डॉ. भडांगे हॉस्पिटल या आठ खासगी कोविड रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि, सिन्नरला पाहिजे त्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप डॉ. गुरुळे यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात विनाकारण शाब्दिक वाद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शनिवार, दि. १७ रोजी नाशिक जिल्ह्यात १२६९ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. त्यात निफाडला २३१, येवला ७०, दिंडोरी ९४, नांदगाव ६०, कळवण ५०, सटाणा ४५, गिरणारे ४० अशा संख्येने इंजेक्शन पुरविण्यात आले. मात्र सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असताना सिन्नरला केवळ ३६ इंजेक्शन देण्यात आल्याचे डॉ. गुरुळे यांनी म्हटले आहे. १९ तारखेला जिल्ह्यात ३५२ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. त्यात सिन्नर तालुक्याला एकही इंजेक्शन मिळाले नसल्याने सिन्नरवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
कोट....
‘सिन्नर ग्रामीण रुग्णालयासह सिन्नरला आठ खासगी कोविड रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत सिन्नर तालुक्याला अतिशय कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यावर हा अन्याय आहे. सिन्नरच्या रुग्णालयांवर दुजाभाव करण्यात येऊ नये. रुग्णसंख्या विचारात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा केला जावा.
डॉ. दिलीप गुरुळे, अध्यक्ष