सिन्नर नगरपालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश
By admin | Published: January 14, 2016 10:42 PM2016-01-14T22:42:24+5:302016-01-14T22:44:00+5:30
शुभ वर्तमान : अनुदानासह वाढणार नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या
सिन्नर : राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने सिन्नर नगरपालिकेचा ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात समावेश केला आहे. सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने अनुदानवाढीसह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी संख्या वाढणार असल्याने सिन्नरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या वाढण्यासह शहराचा चोहोंबाजूने विस्तार होत आहे. त्यामानाने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना निधीअभावी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. क वर्ग नगरपालिकेला त्यामुळे अनेक मर्यादा होत्या. शासनाकडून मिळणारा निधी कमी पडत होता. हद्दवाढ झाल्याने अनेक उपनगरे शहरात समाविष्ट झाली होती. त्यामुळे सर्वांना मूलभूत सुविधा पुरविताना पालिकेची दमछाक होत होती.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६५ हजार २९९ एवढी झाली आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने सिन्नर पालिकेला ब वर्ग दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे शहर विकासासाठी पूर्वीपेक्षा जास्त निधी मिळणार आहे. क वर्गाच्या पालिकेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित होती. हंगामी कंत्राटदार भरून शहरातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून आटापिटा केला जात होता. ब वर्ग दर्जा मिळाल्याने पालिकेला २७ संवर्गातील अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या अभियंत्यांची संख्या ११ होणार आहे.
पालिकेचा बवर्गात समावेश झाल्याने मिळणारा निधी वाढणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने शहर विकासाच्या कामांना वेग येणार आहे. शासनाच्या मोठ्या योजना मिळण्यासही आता पालिका पात्र ठरणार आहे. अनेक शासकीय योजना मिळविण्यासाठी यापूर्वीही पालिकेला १० टक्के स्वत:चा खर्च करावा लागत होता. आता मात्र १५ ते २० टक्क्यांपर्यंत पालिकेला विकास योजना राबविण्यासाठी स्वनिधी खर्च करावा लागणार आहे. (वार्ताहर)