सिन्नर - नायगाव रस्ता बनला अपघातप्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:14 AM2021-07-30T04:14:56+5:302021-07-30T04:14:56+5:30
सिन्नरच्या उत्तर भागातील सिन्नर - नायगाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ...
सिन्नरच्या उत्तर भागातील सिन्नर - नायगाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर काही भागात खड्ड्यांनीच रस्ता व्यापला आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्यामुळे वाहन चालकांना पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता असल्यामुळे व माळेगाव औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने वाहनांची चोवीस तास वर्दळ असते.
सिन्नर ते नायगाव (पानसरे वस्ती)पर्यंत हा रस्ता अरुंद आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या खोलवर गेल्याने एकाचवेळी दोन वाहने पास होतांना अनेकदा अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा साईड देण्यावरून वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. रात्रीच्या वेळी मोटारसायकल चालकांना मोठ्या गाड्यांच्या रंगीबेरंगी लाईटमुळे तसेच अरूंद रस्ता व खोलवर गेलेल्या साईडपट्ट्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
इन्फो
देवीमार्गाचीही वाट बिकट
देवीमार्ग या रस्त्याची तर गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. नाशिक - पुणे महामार्ग तसेच महाविद्यालय, जामगाव -पास्ते आदी ठिकाणी जाण्यासाठी तसेच नायगाव, सायखेडा या रस्त्याला जोडणारा हा रस्ता जवळचा असल्याने या मार्गानेही जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. सध्या हा मार्ग अपघातप्रवण बनला असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालण्याची कसरत वाहन चालकांना करावी लागत आहे. अशीच अवस्था जायगाव घाटाजवळून जाणाऱ्या माळेगाव एमआयडीसी फाट्यावरही पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे छोट्या तसेच अवजड वाहनांचे हाल होत आहेत.
फोटो - २९ सिन्नर-निफाड रोड
सिन्नर - नायगाव - सायखेडा या रस्त्याला जोडणाऱ्या देवी रोडची असंख्य खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे.
=
290721\29nsk_24_29072021_13.jpg
फोटो - २९ सिन्नर-निफाड रोड सिन्नर - नायगाव - सायखेडा या रस्त्याला जोडणाऱ्या देवी रोडची असंख्य खड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली आहे.