सिन्नर फाटा येथील आठवडे बाजाराला मिळू लागला पुन्हा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:13 AM2017-11-27T00:13:50+5:302017-11-27T00:15:23+5:30
सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
मनोज मालपाणी
नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. सिन्नर फाटा येथील भाजीबाजार १९७० ते १९९० पर्यंत मोठी बाजारपेठ होती. त्या ठिकाणी कृषी बाजार उपसमितीदेखील कार्यरत होती. त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आदी सर्वप्रकारची बाजारपेठ म्हणून सिन्नरफाटा बाजारपेठेला मोठे महत्त्व होते. त्या ठिकाणी नाशिकरोड परिसर, गांधीनगर, जेलरोड व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत होते. तर शेतकरी, आडतदार, व्यापारी यांचीदेखील मोठी रेलचेल होती. १९९२ मध्ये मनपाने या ठिकाणी भाजीबाजारासाठी ओटेदेखील बांधून दिले. मात्र त्यानंतर विविध कारणांमुळे व नाशिकरोड परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास आदी कारणांमुळे सिन्नर फाटा बाजारपेठेचे वैभव हळूहळू लयास गेले. सिन्नर फाटा भाजीबाजारातील कृषी बाजार उपसमिती आवार एकलहरा रोडवरील स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाले. मात्र त्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष न दिल्याने सिन्नर फाटा उपबाजार आवार पाहिजे तसा फुलला नाही. त्यामुळे आजही नाशिकरोड पूर्व भागातील व त्यापुढील शेतकºयांना आपला शेतीमाल नाशिकच्या बाजार समिती आवारात घेऊन जावा लागत आहे. अडीच महिन्यांपूर्वी सिन्नर फाटा उपबाजार आवारात ‘शनिवारचा आठवडे बाजार’ सुरू करण्यात आला. प्रारंभी दोन्ही शनिवारी झालेल्या पावसामुळे आठवडे बाजार बसण्यास अडचण झाली होती. मात्र त्यानंतर भाजी व इतर विक्रेत्यांनी जिद्दीने शनिवारी सदर ठिकाणी दुकाने थाटण्यास सुरुवात केली. नाशिकरोड व आजूबाजूच्या भागातील रहिवाशांना जसजशी सिन्नर फाटा येथील शनिवारच्या आठवडे बाजाराची माहिती मिळू लागली तसतसा आठवडे बाजार बहरू लागला आहे. कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, विविध प्रकारचे विक्रेते यांच्याशी संपर्क साधून अजून प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच नाशिकरोड व आजूबाजूच्या भागातील रहिवाशांपर्यंत शनिवारच्या आठवडे बाजाराची माहिती पोहचविल्यास पूर्वीच्या सिन्नर फाट्याच्या भाजीबाजारपेठेचे लयास गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यास जास्त वेळ लागणार नाही. याकरिता कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे.
सुविधांची नितांत गरज
सिन्नर फाटा उपबाजार आवारात स्वच्छता, जमीन सपाटीकरण, विद्युत व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय अशा गरजेच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शनिवारच्या आठवडे बाजारात विविध विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करून व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच बहुतेक भाजीपाला विक्रेते दररोज व्यवसायासाठी बसण्यासाठी तयार आहेत. त्यादृष्टीने कृषी बाजार समितीने बैठक घेऊन नियोजन करणे, रहिवाशांना भाजी मार्केटची माहिती करून देणे गरजेचे आहे. यामुळे रोजगार, व्यवसायाची संधी प्राप्त होऊन इतर व्यवसायांनादेखील फायदा होईल. तर रहिवाशांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळेल. शेतकºयांना नाशिकला जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील निर्धारित वेळेची शेतकºयांची वर्दळ कमी होईल. कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी प्रामाणिकपणे लक्ष देऊन नियोजन केल्यास नक्कीच सिन्नर फाटा बाजारपेठेला पुनर्वैभव प्राप्त होईल.