सिन्नरचे प्रकल्प पूर्ण करणार!
By admin | Published: November 18, 2016 12:47 AM2016-11-18T00:47:30+5:302016-11-18T00:53:02+5:30
निवडणूक : प्रचार सभेत मुख्यमंत्र्याचे आश्वासन
सिन्नर : काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहतो. त्यामुळे सिन्नर शहराच्या विकासाचे जेवढे प्रकल्प असतील, त्यासाठी पैसा कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पालिका निवडणुक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची हुतात्मा चौकात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, राजेश नवाळे, चंद्रकांत वरंदळ, राहूल बलक, दिलीप शिंदे, थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक मोरे यांच्यासह भाजपाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
शहरे बदलण्यासाठी पैसे लागत नाही. त्यासाठी द्रष्टा नेता असावा लागतो. सुदैवाने सिन्नरकरांना कोकाटे यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा नेता लाभल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सिन्नरला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करा, पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे ते म्हणाले.
गेल्या ६०-७० वर्षात महिलांसाठी शौचालये बांधता आली नाही याला विकास म्हणता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कडवा धरणातून राबविण्यात येणारी पाणीयोजना, नाविन्यपूर्ण विंड मिल, प्रशासकीय इमारत व पालिका रुग्णालयाच्या अपूर्ण कामासाठी निधी देण्याची मागणी कोकाटे यांनी केली. त्याचबरोबर पूर्व भागातील ४० गावे टॅँकरमुक्त करण्यासाठी देवनदी वळण योजनेसाठी वर्क आॅर्डर देण्याची मागणी कोकाटे यांनी केली. योजनांना पैसा द्या, मी सिन्नरला स्मार्ट सिटी बनवून दाखवतो अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली. मुख्यमंत्र्यावर विश्वास असून ते या निधी देतील असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)