सिन्नरला ११० व्या शौर्यदिनाचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 05:42 PM2019-12-22T17:42:36+5:302019-12-22T17:43:33+5:30
सिन्नर : भारत भूमीला ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊन जगत आहोत. याचीच कृतज्ञता म्हणून हुतात्म्यांच्या बलिदानाची जाण ठेवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. हेमंत टिळे यांनी केले. वंदे मातरम संघटनेच्या वतीने येथील हुतात्मा स्मारकात आयोजित ११० वा शौर्यदिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे गटनेते हेमंत वाजे होते.
व्यासपीठावर उद्योजक एम. जी. कुलकर्णी, भिकुसा शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाठ, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष किरण गवळी, नगरसेवक प्रमोद चोथवे, नगरपरिषदेचे अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, रामनाथ जाधव, जे. पी. महाले आदी उपस्थित होते. यावेळी हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या प्रतिमेस व स्मारकात असलेल्या हुतात्म्यांच्या कोनशिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी हुतात्मा अनंत कान्हेरे या १८ वर्ष वयाच्या क्र ांतीविराने नाशिकचा तत्कालीन जुलमी कलेक्टर जॅक्सन याला विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या झाडून यमसदनी पाठवले. या घटनेला आज ११० वर्ष पूर्ण झाली. या शौर्याची आठवण म्हणून हा शौर्यदिन साजरा केला जात असल्याचेही प्रा. टिळे म्हणाले. डॉ. महावीर खिंवसरा यांनी प्रास्ताविक केले. हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांचे फोटो व त्यांच्या कार्यासंबंधीची माहिती लावण्यात यावी अशी मागणी नगरपरिषदेकडे वंदे मातरम संघटनेच्यावतीने करण्यात आली. गटनेते हेमंत वाजे तसेच नगरसेवक प्रमोद चोथवे यांनी ही मागणी पूर्ण करून प्रतिमा स्थापन करण्यात येतील तसेच दरवर्षी शौर्यदिनाचा कार्यक्र म पालिकेच्या वतीने आयोजित केला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी राजेंद्र देशपांडे, सत्यजित कळवणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज भंडारी, पराग शहा, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोरडे, संजय बर्वे, दीपक भंडारी, राजेंद्र बेदरकर, संजय परदेशी, मुन्ना बनसोड, संतोष शेलार, अमोल चव्हाण, शुभम निचळ, अ. भा. विद्यार्थी परिषदेचे मदन कात्रजकर, शंतनू कोरडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.