सिन्नरला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:35+5:302021-05-25T04:16:35+5:30
नाशिक जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण मे महिन्याच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे १२ मेपासून २३ मेच्या रात्रीपर्यंत ...
नाशिक जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण मे महिन्याच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे १२ मेपासून २३ मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या १२ दिवसांच्या काळात किराणा दुकानांसह भाजीपाला विक्रीही बंद ठेवण्यात आली होती. १२ दिवसांनंतर आज सोमवारी लॉकडाऊन शिथिल होताच किराणा दुकान, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी मास्कचे बंधन पाळलेले दिसून आले; मात्र सामाजिक अंतर पाळताना कोणीही दिसून येत नव्हते. शहरातील गणेशपेठ, सरस्वती पूल, बसस्थानक परिसर, गावठा, सरदवाडी रोड, वावीवेस या भागात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या गावांमध्येही हेच चित्र होते. कडक लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सकाळी ७ ते ११ या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत.
इन्फो
निगेटिव्ह दाखल्यांची तपासणी
सिन्नर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वावी गावात सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांनी गावात फेरी मारून दुकानदार व त्यांच्याकडील कामगारांना दुकाने सुरू करण्यापूर्वी कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्याचे आवाहन केले. किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने सुरू राहणार आहेत त्यांनी रॅपिड टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी सांगितले. भाजीपाला विक्रेत्यांच्या कोरोना टेस्टच्या प्रमाणपत्राची सहायक निरीक्षक कोते यांनी पाहणी केली. उर्वरित व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
फोटो - २४ सिन्नर बाजार
सिन्नर तालुक्यातील वावी येथे भाजीपाला विक्रेत्यांच्या कोरोना निगेटिव्ह असल्याच्या कागदपत्रांची पाहणी करताना सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते. समवेत सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, दशरथ मोरे आदी.
===Photopath===
240521\24nsk_42_24052021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ सिन्नर बाजार सिन्नर तालुक्यातील वावी येथे भाजीपाल्या विक्रेत्यांच्या कोरोना निगेटिव्ह असल्याच्या कागदपत्राची पाहणी करतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते. समवेत सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, दशरथ मोरे आदि.