सिन्नरला सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळा उपाशीपोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:18 AM2021-10-29T01:18:18+5:302021-10-29T01:18:43+5:30
सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या सरपंचांनी दुसऱ्या दिवशी कार्यशाळेवर बहिष्कार टाकून काढता पाय घेतला.
सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या सरपंचांनी दुसऱ्या दिवशी कार्यशाळेवर बहिष्कार टाकून काढता पाय घेतला. कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांवर शासनाकडून चहा-पाणी व भोजनावर खर्च करण्याची तरतूद असताना पंचायत समिती प्रशासनाने खर्चावर आखडता हात का घेतला याविषयी खमंग चर्चा सुरू झाली आहे.
आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत २०२२-२३ चा विकास आराखडा बनविण्यासंदर्भात सिन्नर पंचायत समितीने पंचायत समिती सभागृहात दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. पंचायत समितीच्या सभागृहाची आसनक्षमता कमी असताना तालुक्यातील ११४ सरपंच व ७३ ग्रामसेवकांना या कार्यशाळेचे आमंत्रण धाडण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. २७) रोजी दिवसभर सरपंच आणि ग्रामसेवक यांना पाणी, चहा आणि भोजन पुरवण्याचा विसर पंचायत समितीच्या प्रशासनाला पडला. वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण संपल्यानंतर सरपंच व प्रशिक्षणार्थी परतीचा प्रवास करत असताना मसाला भात आल्याचे समजते. बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत प्रशिक्षणार्थी चहा-पाणी व भोजनापासून वंचित राहिले.
--------------------
शासनाकडून जेवणासाठी तरतूद
कार्यशाळेसाठी उपस्थित राहणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणी, चहा आणि जेवणासाठी ८०० रुपयांची शासनाने तरतूद केलेली असतानाही पंचायत समितीने, प्रशासनाने हात आखडता का घेतला, असा सवाल सरपंच घोटेकर यांनी उपस्थित केला आहे. पहिल्या दिवशी कार्यशाळेत दाखवण्यात येणारे पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू करण्यास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यातही प्रकाश व्यवस्थेचा अभाव, व्हिडिओ दिसत असले तरी न येणारा आवाज यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना सरपंच आणि ग्रामसेवकांना करावा लागला.
-----------------------------
पहिल्या दिवशी दिवसभर या प्रशिक्षणात थांबून असलेल्या सरपंच व ग्रामसेवकांना पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने ना पाणी दिले, ना चहा. तहान लागल्याने अनेकांनी ओरड सुरू करताच सरपंच परिषदेचे अध्यक्ष योगेश घोटेकर यांनी विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सायंकाळी मसाला भात आला. मात्र, तोपर्यंत बहुतेकांनी सभागृह सोडले होते. बुधवारच्या गैरसोयींमुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी केवळ ३० च्या आसपास सरपंच उपस्थित झाले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
-------------------------
बहिष्कार टाकून सरपंच पडले बाहेर
गुरुवारी सरपंचांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या दालनात जाऊन आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर दिवाळीनंतर पूर्ण सोयीसुविधांयुक्त ही कार्यशाळा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या एकूण प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत उपस्थित सरपंचांनी या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकत घरी जाणे पसंत केले.
-------------
‘पंचायत समिती प्रशासनाकडून कार्यशाळेचे गांभीर्य घेतले गेले नाही. कार्यशाळेला शासनाकडून निधी मिळतो. मात्र, पहिल्या दिवशी कार्यशाळेत चहा-पाणी विचारले नाही व जेवणाची व्यवस्था नव्हती. सरपंच हा संपूर्ण गावाचे प्रतिनिधित्व करतो. अशा लोकप्रतिनिधींना पंचायत समितीत दुय्यम वागणूक मिळते. उपाशीपोटी कार्यशाळा घेऊन पंचायत समिती प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे होते, ते समजले नाही.
-योगेश घोटेकर, अध्यक्ष सरपंच परिषद, सिन्नर तालुका