सिन्नर : सभापतिपदी शिवेसेनेच्या शोभा बर्के बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 04:24 PM2019-12-31T16:24:45+5:302019-12-31T16:24:53+5:30
सिन्नर : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सिन्नर : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापतिपदी शिवसेनेचेच नायगाव गणाचे सदस्य संग्राम शिवाजीराव कातकाडे यांची निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास पहिल्यांदाच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापतिपद इतर मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव होते. शिवसेनेकडून सभापतिपदासाठी शोभा बर्के यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून जगन्नाथ भाबड यांनी स्वाक्षरी केली होती. उपसभापतिपदासाठी शिवसेनेकडून गटनेते संग्राम कातकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून माजी सभापती भगवान पथवे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. राष्टÑवादी कॉँगेसचे आमदार माणिकराव कोकाटे समर्थक व तांत्रिकदृट्या भाजपात असलेल्या योगिता बाबासाहेब कांदळकर यांनीही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सूचक म्हणून भाजपाचे गटनेते व आमदार कोकाटे समर्थक विजय गडाख यांनी स्वाक्षरी केली होती. तथापि, गडाख यांनी राज्यात महाविकास आघाडीचे शासन असल्याने व कोकाटे यांच्या आदेशाने आपल्या उमेदवारीची माघार घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आपण शिवसेनेच्या उमेदवारास पाठींबा देत असल्याचे सांगितले. निर्धारित वेळेत योगिता कांदळकर यांनी माघार घेतल्याने सभापतिपदी शोभा बर्के यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी संग्राम कातकाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कोताडे यांनी केली. बैठकीस माजी उपसभापती संगिता पावसे, पंचायत समिती सदस्य सुमन बर्डे, वेणूबाई डावरे, रोहिणी कांगणे, रवींद्र पगार, तातू जगताप उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती सौ. शोभा बर्के यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे तर उपसभापती संग्राम कातकाडे यांचा जगन्नाथ भाबड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक पंकज मोरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नारायण वाजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, अरुण चव्हाणके, सुजाता तेलंग, अनिल सांगळे, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे, विनायक शेळके, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, दीपक बर्के, संदीप भाबड, सोमनाथ वाघ, नीलेश कातकाडे, संजय शेळके, एकनाथ आव्हाड, रामदास चकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब आव्हाड तर शशिकांत येरेकर यांनी आभार मानले.