सिन्नर तालुक्यात शेतात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:06 PM2019-11-06T15:06:35+5:302019-11-06T15:06:49+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालाचे नुकसान होण्यासह शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहे. पशूधनही अडचणीत असून पाथरे परिसरातील शेतक-यांना पावसामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोयाबीन, मका, बाजरी, डाळिंब, घास, द्राक्ष यासारखे पिकांचा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांना शेतामध्ये अजूनही पावसाचे पाणी तुंबलेले, साचलेले आहे. त्यामुळे रोगराईला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जनावरांनाही वेगवेगळे आजार होऊ लागले आहे. डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील विनायक बन्सी नरोडे, सुरेश बन्सी नरोडे, गणपत शिवराम नरोडे, सतीश शिंदे या शेतकºयांच्या शेतात पावसाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उजव्या कालव्याच्या शेजारीच या शेतकºयांची शेती, घरे आहेत. जवळपास एक महिन्यापासून पावसामुळे वाहून येणारे पाणी या शेतकºयांच्या शेतात साठत आहे. यामुळे तीन एकर डाळिंब, दोन एकर ऊस, दीड एकर मका, एक बिघा वांगे, घास आदी पिके पाण्यात आहे. शेजारी उजवा कालवा आणि बारा गाव पाणी पुरवठा योजना यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जीरत नाही आणि वाहून जाण्यास जागा नसल्याने ते तुंबून राहत आहे. त्यामुळे जवळपास वीस जनावरे गोठ्यात बांधता येत नाही आणि जनावरांना जमिनीवर बसताही येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी बाधित शेतकºयांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत त्यांना प्रशासनामार्फत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.