सिन्नरला पोलीस चौक्या नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:30+5:302020-12-04T04:37:30+5:30
सिन्नर शहरात दोन पोलीस चौक्या आहेत. बसस्थानकाजवळ पंचवटी हॉटेलच्या सहकार्यातून देखणी व सुंदर पोलीस चौकी उभारून देण्यात आली आहे. ...
सिन्नर शहरात दोन पोलीस चौक्या आहेत. बसस्थानकाजवळ पंचवटी हॉटेलच्या सहकार्यातून देखणी व सुंदर पोलीस चौकी उभारून देण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याच्या उद्देशातून या चौकीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी कधीही वाहतूक पोलीस नजरेत पडत नाही. बसस्थानकाच्या आवारात बांधण्यात आलेली ही सुंदर चौकी धूळखात पडून असल्याचे चित्र आहे, तर शिवाजी चौकातील पोलीस चौकी कधी उघडी तर कधी बंद अवस्थेत असते. नव्याने काही वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमा हाऊसजवळ उद्योजकांच्या सहकार्यातून पोलीस चौकी उभारण्यात आली. औद्योगिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही चौकी उभारण्यात आली. मात्र याठिकाणीही अनियमितीतता दिसून येते. कधी कर्मचारी असतात, तर कधी बंद असते. ग्रामीण भागातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाच्या पुढे नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. याठिकाणी केवळ रात्रीच्यावेळी नाकाबंदी असेल तर कर्मचारी असतात. अन्यवेळी ही चौकी बंदच असते. दररोज नाकाबंदी असेलच असे नाही त्यामुळे ही चौकी केवळ नावापुरती आहे.
फोटो ओळी- सिन्नर बसस्थानकाजवळील सुंदर; पण नेहमी बंद अवस्थेत असणारी वाहतूक पोलीस चौकी.
(२८ सिन्नर पोलीस चौकी)