सिन्नरला एटीएम फोडून सुमारे २३ लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:30 AM2021-10-16T01:30:47+5:302021-10-16T01:31:15+5:30

सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Sinnar was robbed of Rs 23 lakh by breaking into an ATM | सिन्नरला एटीएम फोडून सुमारे २३ लाख लांबविले

सिन्नर येथे सरवादडी रस्त्यावरील चोरी झालेल्या एटीएममध्ये ठशांचे नमुने घेताना ठसे तज्ज्ञ.

Next
ठळक मुद्देसरदवाडी रस्ता : अद्ययावत गॅस कटरचा वापर

सिन्नर : सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी जातांना एटीएमचे शटर ओढून बंद करून घेतल्याने शुक्रवारी (दि.१५) दुपारी २ वाजेच्या सुमारास चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला.

सिन्नर-सरदवाडी रस्त्यावर हॉटेल अजिंंक्यताराजवळ ॲक्सिस बॅँकेचे एटीएम आहे. यात हिताची कंपनीमार्फत कॅश लोड केली जाते. गुरुवारी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स पकडीच्या साहाय्याने तोडल्या. एटीएमचे शटर बंद करून चोरट्यांनी अद्ययावत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापले. चोरट्यांनी एटीएम मशीनमधील २२ लाख ७१ हजार ३०० हजार रुपये घेऊन पोबारा केला. जातांना चोरट्यांनी एटीएमचे शटर बंद करुन घेतले.

दसऱ्याच्या दिवशी दुपारपर्यंत एटीएम बंद होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास एटीएम बंद असल्याने शटर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

इन्फो

ठसेतज्ज्ञांना पाचारण

परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. एमटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची हार्ड डिस्क तपसण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हिताची कंपनीचे अधिकारी संतोष वेणुनाथ झाडे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीची फिर्याद दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांचे पथक हजर झाले होते. एटीएममध्ये ठशांचे नमुने घेण्याचे काम सुरू होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title: Sinnar was robbed of Rs 23 lakh by breaking into an ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.