सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:24 PM2023-03-15T15:24:50+5:302023-03-15T15:26:13+5:30

मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी असणार आहे.

Sinnar will have a 40-feet high skyscraper, a procession to welcome the New Year | सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार

सिन्नरला ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी, नववर्षाच्या स्वागताला शोभायात्राही निघणार

googlenewsNext

शैलेश कर्पे

सिन्नर (जि. नाशिक) : मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान जपण्यासाठी नववर्ष स्वागतासाठी सिन्नरला भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मोठ्या उत्साहात सिन्नरकर या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. सिन्नर सांस्कृतिक मंचाच्यावतीने आयोजित बैठकीत शोभायात्रा नियोजनाची तयारी करण्यात आली. सिन्नर सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोभायात्रेचे नियोजन केले. त्यात सहभागी होण्याचे आवाहन कृष्णाजी भगत, प्रकाश नवसे, हेमंत वाजे, प्रा. राजाराम मुगसे, मनीष गुजराथी आदींसह सदस्यांनी केले आहे. नववर्ष दिनी बुधवारी (दि.२२) सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर ४० फुट उंचीची गगनचुंबी गुढी विधिवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे. यानंतर सांस्कृतिक स्वागत यात्रेचा शुभारंभ होईल. मिरवणुकीच्या आरंभी सजवलेली गणेश पालखी असणार आहे.

पारंपरिक पुणेरी ढोल-ताशांचा निनाद, घोड्यावर स्वार झालेले राष्ट्रपुरुष व विरांगणांच्या रूपातील तरुण-तरुणी, गणेशाची पालखी, लेझीम पथक, टिपरी, बुलेट रॅली, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची नऊवारी साडीतील स्कुटी रॅली, तुतारी, वासुदेव, गोंधळी, भजनी मंडळ, संबळ-पिपाणी, मल्लखांब व दोरीवरील मल्लखांब (मुलीचे) अशा एक ना अनेक पारंपरिक वैशिष्ट्यांनी भरलेल्या या शोभा यात्रेत पारंपरिक मराठी वेश परिधान करून सर्व स्तरातील महिला-पुरुष सहभागी होणार आहेत.

सामाजिक मंडळांचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन गणेशपेठ-भिकुसा कॉर्नर-शिंपी गल्ली- लालचौक- गंगावेस खडकपुरा जुनी नगरपालिका-महालक्ष्मी रोड-नाशिकवेस मार्गे नर्मदा लॉन्स येथे समारोप होईल. शोभायात्रेत सर्व सार्वजनिक व सामाजिक मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, विविध शाळा, महाविद्यालये तसेच महिला, पुरुषांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृष्णाजी भगत व सांस्कृतिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

चौका-चौकात रांगोळ्या, पुष्पवृष्टी

शहरातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा जाणार असून चौकाचौकात रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. विविध मित्रमंडळ, समाजातील महिला व मित्रमंडळाचे सदस्य गटागटाने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

Web Title: Sinnar will have a 40-feet high skyscraper, a procession to welcome the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.