सिन्नरला राजाभाऊ वाजे ‘जायंट किलर’
By admin | Published: October 19, 2014 09:41 PM2014-10-19T21:41:28+5:302014-10-20T00:09:14+5:30
सिन्नरला राजाभाऊ वाजे ‘जायंट किलर’
सिन्नर : संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा २० हजार ५५४ मतांनी दणदणीत पराभव करीत ‘जायंट किलर’ बनण्याचा बहुमान मिळवला. सलग तीन निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या कोकाटे यांची घोडदौड रोखण्यात वाजे यांना यश मिळाले.
भाजपाचे उमेदवार कोकाटे-वगळता कॉँग्रेसचे उमेदवार संपत संतू काळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शुभांगी सुरेश गर्जे यांच्यासह सर्व उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली.
सिन्नर महाविद्यालयात सकाळी ८ वाजता निवडणूक अधिकारी अरुण ठाकूर, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळपासूनच महाविद्यालयाबाहेर वंजारी समाज मैदानावर निकाल ऐकण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
२० फेऱ्यांमध्ये झालेल्या मोजणीत वाजे - कोकाटे अशी दुरंगी लढत दिसून आली. पहिल्या दहा फेऱ्यांपर्यंत कोकाटे यांनी आघाडी टिकवून धरली होती. मात्र उर्वरित ११ ते २० फेऱ्यांमध्ये वाजे यांनी एकतर्फी आघाडी घेत कोकाटे यांचा २० हजारांहून अधिक मतांनी दारुण पराभव केला. पोस्टल मतमोजणीतही वाजे यांनी कोकाटे यांच्यापेक्षा १२८ मतांची आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत कोकाटे यांनी वाजे यांच्यावर ९३९ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत १७५१, तर तिसऱ्या फेरीत कोकाटेंची आघाडी ४ हजार ९१३ वर पोहोचली. चौथ्या फेरीत कोकाटे यांची आघाडी कमी होऊन तीन हजार ६४५वर आली. पाचव्या फेरीत कोकाटे यांनी पुन्हा जोरदार मुसंडी मारीत आघाडी पाच हजार ७८वर नेवून ठेवली. सहाव्या फेरीनंतर कोकाटे यांची आघाडी कमी होण्यास प्रारंभ झाला. सहाव्या फेरीत ४ हजार २१३ तर सातव्या फेरीत ३ हजार ५१३ मतांची कोकाटे यांची वाजे यांच्यावर आघाडी होती. आठव्या फेरीत कोकाटे यांची आघाडी १ हजार ४५४ मतांवर आली. नवव्या फेरीत वाजे यांनी प्रथमच जोरदार मुसंडी मारीत कोकाटे यांना १ हजार ६३७ मतांनी पिछाडीवर पाडले. दहाव्या फेरीत पुन्हा कोकाटे यांनी कमबॅक करीत वाजे यांच्यावर ४३९ मतांनी आघाडी घेत आपले आव्हान कायम ठेवले. अकराव्या फेरीत वाजे ३३ मतांनी नाममात्र पुढे होते. बाराव्या फेरीत वाजे यांनी कोकाटे यांच्यावर २ हजार ६५७ मतांनी आघाडीत घेतली. बाराव्या फेरीपासून वाजे यांचा विजयाचा वारु उधळला तो शेवटच्या फेरीपर्यंत. १३ व्या फेरीत वाजे ४ हजार ४९ तर १४ व्या फेरीत ४ हजार ५३१ मतांनी पुढे होते. १५ व्या फेरीत वाजे यांनी निर्णायक आघाडी घेत कोकाटे यांच्यावर १० हजार २०३ मताधिक्य नेऊन ठेवले. पंधराव्या फेरीनंतर वाजे एकतर्फी विजय मिळवतील अशी चिन्हे दिसू लागली. उर्वरित प्रत्येक फेरीत वाजे यांनी कोकाटे यांना धोबीपछाड दिला. १६ व्या फेरीत वाजे १४ हजार ९४ मतांनी तर १७ व्या फेरीत १६ हजार ५२८ मतांनी आघाडीवर होते. १८ व्या फेरीत वाजे यांनी १७ हजार ४०५ तर १९ व्या फेरीत १९९३५ मतांनी आघाडी घेतली होती. शेवटच्या २० व्या फेरीत वाजे हे कोकाटे यांच्यापेक्षा २० हजार ४२६ मतांनी पुढे राहिले. ५६५ पोेस्टल मतदानात ५१ मते बाद ठरली. ५१४ वैध मतांपैकी वाजे यांना ३१५ तर कोकाटे यांना १८७ मते मिळाली. पोस्टल मतदानात वाजे यांनी कोकाटे यांच्यावर १२८ मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे वाजे यांना २० हजार ५५४ मतांनी विजयी घोषीत करण्यात आले. (वार्ताहर)