सिन्नरभूषण ह. भ. प. त्र्यंबकबाबा भगत यांचे निधन; भक्त परिवारावर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:16 AM2021-09-09T08:16:43+5:302021-09-09T08:16:57+5:30
सिन्नर ( नाशिक ) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ...
सिन्नर (नाशिक) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक ह. भ. प. त्र्यंबक बाबा भगत (वय 89) यांचे गुरुवारी पहाटे 5 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील त्यांच्या भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन/तीन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यस्वस्थ बनली होती. गुरुवारी पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड आरती सुरु होत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, नातू व संपूर्ण राज्यभर हजारो भक्तगण असा परिवार आहे. सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरात श्री हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 44 वर्षांपासून आयोजन करण्यात येते. तर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात 60 वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. अनेक धार्मिक सोहळ्यांना त्रंबक बाबा यांना विशेष मान होता.
भैरवनाथ मंदिरात सकाळची काकड आरती अनेक वर्षांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरु झाली. भैरवनाथ मंदिर, मोठा गणपती यासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने त्यांचा सिन्नर भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. बाबांच्या निधनाने सिन्नरसह राज्यभरातील त्यांच्या भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.