सिन्नरफाटा पादचारी पूल बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:18 AM2019-08-27T00:18:36+5:302019-08-27T00:19:00+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानक फ्लॅट फॉर्म दोन-तीनवरून देवी चौक-सिन्नरफाटा जुना रेल्वे पादचारी पुलावर जाण्या-येण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सुरक्षितेचे कारण सांगत भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता कुठलीही पूर्वसूचना व बंद मार्गाबाबत माहितीफलक न लावल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नाशिकरोडची काही वर्षांपूर्वी सिन्नरफाटा भागात मोठी बाजारपेठ होती. देवी चौकातील बाजारपेठेतून सिन्नरफाटा येथे जाण्या-येण्यासाठी रेल्वे पादचारी पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता व सध्याच्या परिस्थितीत होतदेखील आहे. सिन्नरफाटा भागातील रहिवासी, विद्यार्थी, कामगार, महिला, प्रवासी नित्याने देवी चौकातील रेल्वे पादचारी पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कुंभमेळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकात येण्या-जाण्यासाठी विविध ठिकाणी मार्ग तयार करण्यात आले. त्यामध्ये देवीचौक जुन्या पादचारी पुलास फ्लॅट फॉर्म दोन-तीनवर जाण्या-येण्यासाठी पायऱ्याचा मार्ग बनविण्यात आला.
यामुळे देवी चौकात पादचारी पुलाखाली पार्किंग करणाºया व नाशिकरोडला शिवाजी पुतळा देवीचौक मार्गे येणाºया रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होत होती. त्यामुळे रेल्वेस्थानकांच्या मुख्य प्रवेशद्वारावरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होत होता.
ठराविक रेल्वे प्रवाशांकडून वापर
देवीचौकातील पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्यासाठी दररोज मुंबई ठाण्याला पंचवटी, गोदावरी, राज्यराणीने प्रवास करणारे काही प्रवासी या मार्गाचा वापर करतात.
मनमाड-इगतपुरी शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजरचे काही प्रवासी या मार्गाचा वापर करतात. बाहेरगावचे व लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांना जास्त करून या मार्गाची माहिती नसल्याने त्यांच्याकडून या मार्गाचा वापर केला जात नाही.
अचानक मार्ग बंद
रेल्वे प्रशासनाकडून गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक सुरक्षितेचे कारण पुढे करून देवी चौक, जुने पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. फ्लॅट फॉर्मवर लोखंडी ग्रीलचा दरवाजा व पादचारी पुलावर पत्रे ठोकून येण्या-जाण्याचा मार्ग बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. देवी चौकात पार्किंग करणाºया प्रवाशांना रेल्वेस्थानकांत येण्या-जाण्यासाठी पायी पायी लांब चकरा माराव्या लागत आहे.
सर्वांचीच झाली गैरसोय
देवीचौक पादचारी पुलावरून रेल्वेस्थानकांत जाण्या-येण्याचा मार्ग बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे देवीचौक व बाजारपेठेच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे. पादचारी पुलावरील रेल्वेस्थानकांत जाणारा-येणारा मार्ग बंद करण्याबाबत आगाऊ सूचना दिली नसून तसा माहितीफलकदेखील न लावण्यात आल्याने प्रवाशांना त्यापर्यंत जाऊन पुन्हा माघारी यावे लागत आहे. प्रवाशांची सोय, भौगोलिक विचार करून किमान दिवसा तरी हा मार्ग सुरू ठेवण्याची गरज आहे.