उच्चांकी तपमानाने सिन्नरकरांची काहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:03 PM2019-04-28T18:03:29+5:302019-04-28T18:03:59+5:30

सिन्नर: तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली होत असल्याचे चित्र आहे.

Sinnarkar's cahini with high temperature | उच्चांकी तपमानाने सिन्नरकरांची काहिली

उच्चांकी तपमानाने सिन्नरकरांची काहिली

Next

चैत्र महिना सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यातील तपमानचा पारा चढल्याने नागरिकांचे हाल होत आहे. सकाळी शहर व ग्रामीण भागात दिसणारी गर्दी दुपारी ११ वाजेनंतर कमी होते. उन्हाच्या दाहकतेमध्ये अचानक वाढ झाल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाणातही घट होत आहे. दुचाकी चालविणारे सनकोट, टोप्या, हातमोझे घालून फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला थंड पेय, सरबते पिण्यासाठी आणि टरबूजाच्या गार गार फोडी खाण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. तपमानात वाढ झाल्याने रात्रीच्यावेळीही नागरिकांना गरम होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर छतावर गरगरनारे पंखे गरम हवा फेकत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना घराबाहेर झोपण्याची वेळ आली आहे. शेतकरी लवकर शेतात जावून दुपारपर्यंत कामे उरकून सावलीचा आधार घेतात. तर जनावरे चारणा-या गुराख्यांना कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो. वैशाख महिन्याला प्रारंभ होण्यास आणखी आठवड्याचा अवधी असतांनाच पेटलेल्या वणव्यामुळे नागरिकांची  काहिली होत आहे.

Web Title: Sinnarkar's cahini with high temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.