सिन्नरकरांचा तीन दिवस लॉकडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:56 PM2020-04-21T21:56:58+5:302020-04-21T21:57:17+5:30
दोन्ही भाजीबाजारात शुकशुकाट
सिन्नर : शासनाने सोमवारपासून संचारबंदीत काहीशी शिथिलता जाहीर केल्याचा फायदा घेऊन गर्दी होऊ नये यासाठी सोमवारपासून शहरात तीन दिवस कडक लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
सुरुवातीला नगराध्यक्ष किरण डगळे यांचे आवाहनाचे पत्र विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाने खंबीर भूमिका घेत लॉकडाउन कडक करण्याचा कालावधी ३ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून (दि.२०) नगर परिषदेच्या वतीने सकाळी ६ वाजेपासून शहराच्या विविध भागात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपकावरून लॉकडाउनची माहती देण्यात येत होती. शेती व उद्योगांसाठी शासनाने उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे. त्याचा गैर अर्थ लावून रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून नगराध्यक्ष डगळे यांच्या नावे आवाहन करणारे पत्र व्हायरल झाले. त्यातून थोडेसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी आडव्या फाट्यावर भाजीबाजार भरला होता. मात्र, त्यानंतर सर्वांना दुकाने बंद करून घरी पाठवण्यात आले. बाजार समितीतील भाजी बाजारातही शेतकऱ्यांसह कुणालाही बसू देण्यात आले नाही. त्यामुळे या दोन्ही भाजीबाजारात शुकशुकाट दिसत होता. शहारातील सर्व किराणा दुकानेही बंद करण्यात आली. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. बसस्थानकासह शहराच्या विविध भागात थांबून रस्त्याने येणा-या-जाणा-या वाहनांची त्यांच्याकडून तपासणी करण्यात येत होती. बाजार समितीत कांदा व धान्याचे लिलाव सुरू होते. दवाखाने व औषधविक्रीची दुकाने सोडून शहरातील सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेत त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.