सिन्नरला स्वच्छता मोहीम
By admin | Published: April 21, 2017 12:50 AM2017-04-21T00:50:10+5:302017-04-21T00:50:22+5:30
सिन्नर : नगरपालिकेच्या वतीने नगरविकास दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सिन्नर : नगरपालिकेच्या वतीने नगरविकास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सार्वजनिक परिसर स्वच्छता मोहीम, पाणी वापराबाबत जनजागृती, बचतगटांतील महिला व सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर आदि कार्यक्रम राबविण्यात आले.
गुरुवारी सकाळी ९ वाजता गोंदेश्वर मंदिर परिसरात नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महिला स्वयंसहाय्यिता गटाच्या सदस्य व नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली. परिसरातील गोळा केलेला सर्व कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी नगरपालिका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी पालिकेच्या कामकाजाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करण्याचे आवाहन दुर्वास यांनी यावेळी केले.
सफाई कामगारांनी प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण परिसराची साफसफाई करून नागरिकांना चांगले वातावरण देऊ शकणार असल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे म्हणाले. यावेळी हेमंत वाजे, बाळासाहेब उगले, शैलेश नाईक, विजय जाधव, सुजाता तेलंग, विजया बर्डे, अलका बोडके, प्रतिभा नरोटे, वासंती देशमुख, ज्योती वामने, नितीन परदेशी उपस्थित होते. (वार्ताहर)