सिन्नरला विकासाच्या चढाईसोबत श्रेयवादाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:24+5:302021-08-26T04:17:24+5:30
शैलेश कर्पे लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : १८६० साली सुुरू झालेल्या सिन्नर नगर परिषदेच्या स्थापनेला १६० वर्षे पूर्ण झाली ...
शैलेश कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : १८६० साली सुुरू झालेल्या सिन्नर नगर परिषदेच्या स्थापनेला १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात आलेल्या सिन्नर नगर परिषदेने अनेक निवडणुका अनुभवल्या. मात्र गेल्या पावणेपाच वर्षांत झालेल्या विकासकामांची यादी मोठी आहे. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही विकासकामांत योगदान देण्यासाठी मोठी चढाओढ केली. विकासाच्या चढाईत मात्र पाच वर्षे श्रेयवादाची चांगलीच लढाई सिन्नरकरांनी अनुभवली.
सिन्नर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सुरू झाले आहे. नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सत्ताधारी शिवसेनेसह स्थानिक पातळीवर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने लढाईसाठी व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. नोव्हेंबर २०१६ रोजी सिन्नर नगर परिषदेच्या १४ प्रभागांत २८ नगरसेवकांसह थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे किरण डगळे यांचा साडेचार हजार मतांनी विजय झाला होता. थेट नगराध्यक्षासह शिवसेनेच्या २८ पैकी १७ नगरसेवक विजयी झाले होते. त्या वेळी माणिकराव कोकाटे भाजपत होते. भाजपचे १० नगरसेवक विजयी झाले होते तर एक अपक्ष नगरसेविका विजयी झाली होती. त्यानंतर अपक्ष नगरसेविकेने शिवसेनेत प्रवेश केल्याने बहुमतात असलेल्या शिवसेनेची ताकद वाढली होती. कोकाटे आणि वाजे या आजी-माजी आमदारांच्या सक्रिय योगदानामुळे सुमारे पावणेपाच वर्षांत नगर परिषदेत कोट्यवधींची विकासकामे झाली हे उल्लेखनीय आहे. मात्र श्रेयवादाच्या लढाईने काहीसी राजकीय वादळेही सिन्नरकरांनी अनुभवली.
नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या सिन्नरकरांसाठी कडवा पाणीयोजना या पंचवार्षिक निवडणुकीत मार्गी लागली ही सुखद बाब आहे. सुमारे १०० कोटी रुपयांतून साकार झालेल्या पाणीयोजनेची मुहूर्तमेढ आमदार माणिकराव कोकाटे यांनी रोवली तर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून या योजनेवर कळस चढवला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गेल्या पावणेपाच वर्षांत नगर परिषदेच्या हद्दीतील शहर व उपनगरातील अनेक रस्ते काँक्रीटीकरणाचे व डांबरीकरणाचे झाले. अनेक ठिकाणी भूमिगत गटारीही झाल्या. मात्र विकासकामे करताना सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातच केली गेल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला. अद्याप काही भागांतील रस्ते व भूमिगत गटारींचे काम होणे बाकी आहे. कोरोना महामारीत वसुलीला ब्रेक बसला. बस स्थानक ते वावीवेस रस्ता, भूमिगत वीज तारा, आदर्श मैला व्यवस्थापन प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, सरस्वती नदीपात्राची स्वच्छता, वारकरी भवन, वावीवेस दुरुस्ती, जॉगिंग ट्रॅक, संगमनेर नाका स्मशानभूमीची दुरुस्ती आदींसह शहरात विविध विकासकामे मार्गी लागली. या काळात विकासकामात दुजाभाव, पाणी सोडण्याचा अनियमितपणा याबाबतही विरोधकांनी टीकास्त्र सोडल्याचे वेळोवेळी दिसून आले.
चौकट-
उपनगराध्यक्षपद हिसकावले, शिवसेनेत फूट
नगर परिषदेत शिवसेनेचे बहुमत असताना विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाले. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आमदार झाले. तशी नगर परिषदेत सत्ताधारी गटात काही प्रमाणात गटबाजी समोर आली. भाजपचे दहा नगरसेवक कोकाटे समर्थक असल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. गेल्या वर्षी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना गाफील राहिली. त्याचा फायदा कोकाटे समर्थक नगरसेवकांनी घेतला. शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटून कोकाटे गटात सामील झाले आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतून फुटून कोकाटे गोटात सहभागी झालेले बाळासाहेब उगले उपनगराध्यक्ष झाले. हा शिवसेनेला मोठा धक्का होता.
फोटो- १) सिन्नर नगर परिषद
फोटो -२) किरण डगळे, नगराध्यक्ष
फोटो -३) नामदेव लोंढे, विरोधी गटनेते
250821\25nsk_26_25082021_13.jpg~250821\25nsk_27_25082021_13.jpg~250821\25nsk_28_25082021_13.jpg
फोटो- १) सिन्नर नगरपरिषद~फोटो -२) किरण डगळे, नगराध्यक्ष~फोटो -३) नामदेव लोंढे, विरोधी गटनेते