सिन्नरला अस्वच्छतेचे ग्रहण; वावीला धुळीसह चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:30+5:302021-09-18T04:15:30+5:30
सुरक्षा-सुविधा/सिन्नर-वावी बसस्थानक शैलेश कर्पे लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : राज्यात हायटेक आणि आदर्शवत बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर बस ...
सुरक्षा-सुविधा/सिन्नर-वावी बसस्थानक
शैलेश कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : राज्यात हायटेक आणि आदर्शवत बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर बस टर्मिनलला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानकाचा वाढता विस्तार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर वाढता भार विचारात घेता पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते. तर सिन्नर-शिर्डी महामार्गावर सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च करुन बांधण्यात आलेल्या वावी बसस्थानकात धूळ व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सिन्नर बसस्थानक म्हणजे राज्य परिवहन महामंडळाचे उत्कृष्ट मॉडेल ठरले होते. सिन्नर बसस्थानकात आल्यानंतर विमानतळावर आल्याचा भास काही वर्षांपूर्वी प्रवाशांना निर्माण होत होता. आता मात्र कचराकुंड्या गायब होऊ लागल्या आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात गाजरगवत आणि झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. अवाढव्य बसस्थानकात केवळ दोनच सफाई कर्मचारी असल्याने त्यांना दोन शिफ्टमध्ये काम करताना जास्तीचे काम करण्याची वेळ आली आहे. बसस्थानकाचा परिसर मोठा आहे. बसस्थानकातील फर्ची व सोयीसुविधा जास्त आहेत. त्याची स्वच्छता करताना कर्मचारी संख्या कमी पडू लागली आहे.
स्वच्छतागृहात नेहमीच दुर्गंधी येते. शौचालय व स्वच्छतागृह पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. प्रवाशांकडूनही बेशिस्तीचे वर्तन केले जाते. कचरा कुंडीत कचरा न टाकता बसस्थानकात कोठेही अस्ताव्यस्त कचरा केला जात असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांवर ताण येतो. प्रवाशांनाही प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. स्वच्छतागृहाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याने प्रवाशांना नाक मुरडून आत जावे लागते. बसस्थानकातील काही कचराकुंड्या गायब झाल्या आहेत. कचरा कोठेही फेकला जातो. प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने त्याच्या स्वच्छतेची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर बससेवा सुरु झाल्यानंतर स्थानकात गर्दी वाढली आहे. तशी अस्वच्छताही वाढू लागली आहे.
इन्फो...
वावीच्या बसस्थानकात धूळ आणि चिखल
आंतरराष्ट्रीय खात्याचे देवस्थान असलेल्या शिर्डीमुळे वावी बसस्थानक सुसज्य बांधण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी परिवहन मंत्र्यांकडून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी वावी बसस्थानकाच्या बांधकामाला मंजूर करुन घेतला. मात्र आता बांधकाम पूर्ण होत आले असले तरी बसेसला थांबण्यासाठी जागा नाही. प्लॅटफार्मवर धूळ व चिखलाचे साम्राज्य आहे. दोन बस आल्यानंतर अडचण निर्माण होते. अनेक कामे अपूर्ण आहेत. ते पूर्ण करुन बसस्थानकाचे लोकार्पण करणे गरजेचे आहे. सुमारे कोटी रुपयाचे बसस्थानक बांधून बसेसला थांबण्यासाठी जागा नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल निर्माण होत आहे. ठेकेदाराने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासह प्लॅटफॉर्मचे कॉंक्रीटीकरण करुन बसस्थानकाची धूळ व चिखलातून मुक्तता करणे गरजेचे आहे.
कोट...
सिन्नर बसस्थानकात दोन स्वच्छता कर्मचारी आहेत. मात्र बसस्थानकात प्रशस्त आणि आवार मोठे झाले आहे. प्रवाशांनीही कचरा अस्ताव्यस्त फेकू नये. वावी बसस्थानकाचे काम कोरोनाच्या काळात बंद होते. बांधकामाला परवानगी नव्हती. वावी बसस्थानकात बसेस थांबण्यासाठी दुकानांचे शिफ्टिंग करण्यात येईल. पाठपुरावा सुरु आहे.
- भूषण सूर्यवंशी, आगारप्रमुख, सिन्नर आगार
फोटो ओळी- १७ सिन्नर बस स्टँड
सिन्नर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात वाढलेले गवत.
फोटो ओळी- १७ वावी बस स्टँड
वावी बसस्थानकात बस उभ्या राहणाऱ्या जागेवर कॉंक्रीटीकरण नसल्याने पसरलेली धूळ व चिखलाचे साम्राज्य.
170921\17nsk_22_17092021_13.jpg~170921\17nsk_23_17092021_13.jpg
सिन्नर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात वाढलेले गवत.~वावी बसस्थानकात बस उभ्या राहणाऱ्या जागेवर कॉक्रीकरण नसल्याने पसरलेली धूळ व चिखलाचे साम्राज्य.