सिन्नरच्या उद्योजकाची ५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:07 AM2018-05-30T01:07:16+5:302018-05-30T01:07:16+5:30
मुसगळाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसहतीतील सिमेंट उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची अंबुजा सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून एकाने ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नर : मुसगळाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसहतीतील सिमेंट उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची अंबुजा सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून एकाने ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल जपे यांचा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिमेंट निर्मितीचा उद्योग आहे. त्यांना फेबु्रवारी महिन्यात संशयित आरोपी आसीफ अली याने मोबाईलवर फोन केला. आपण अबुंजा सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे त्याने भासवले. मांडसांगवी ता. नाशिक येथे अंबुजा कंपनीच्या २४ हजार डॅमेज बॅग असल्याचे सांगितले. प्रती बॅग ४८ रुपये दराप्रमाणे ठरवून त्यापोटी ८ रुपये प्रतीबॅग कमिशन देण्याचा व्यवहार ठरला. मेलवर कोटेशन मागवून घेतले. लेटरहेडवर मालाचे कोेटेशन, जीएसटी क्रमांक, पॅनकार्ड, आधारकार्ड व बॅँक खात्याचा नंबर असे मागवून घेतले. जपे यांनी १४ फेबु्रवारी २०१८ रोजी १ लाख ४२ हजार रुपये, १५ फेबु्रवारी रोजी एका खात्यातून ३ लाख तर दुसऱ्या खात्यातून ५० हजार असे एकूण ४ लाख ९२ हजार रुपये सेंट्रल बॅँक आॅफ इंडिया शाखेतून आरटीजीएस केले. त्यानंतर संशयित आरोपी आसीफ अली याने २० फेबु्रवारी रोजी मांडसांगवी येथून माल घेऊन जा असे सांगून फोन बंद केला. संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची जपे यांची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आसीफ अली याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. पी. लावणे अधिक तपास करीत आहेत.