सिन्नरचा नाशिकस्थित तरुण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:35 PM2020-06-08T22:35:13+5:302020-06-09T00:02:29+5:30
कोरोनामुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थित ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स यांना उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिन्नर : कोरोनामुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थित ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स यांना उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकच्या फुलेनगर भागात वास्तव्यास असलेला हा युवक मूळचा सिन्नरच्या जोशीवाडीतील असून, गेल्या आठवड्यात तो सिन्नरला आला होता. या रुग्णास त्रास जाणवल्याने उपचारासाठी तो सिन्नर शहरातील एका डॉक्टरांकडे गेला होता. दोन दिवसांपूर्वी सदर रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले
आहे.
हा रुग्ण नाशिक येथे वास्तव्यास असल्याने तिथेच कंटेन्मेंट झोन होणार असला तरी रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील चौघे, एक डॉक्टर आणि नर्स अशा सहा संशयितांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली. त्यामुळे काहीशा बिनदास्त वावरणाऱ्या सिन्नरकरांची चिंता वाढली असून, त्यांचे लक्ष या सहा रुग्णांच्या अहवालाकडे लागले आहे.
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील ७० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिलेचे पायाचे हाड फॅक्चर झाल्याने शस्त्रक्रियेसाठी तिला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सदर महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. महिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी जामगाव येथे जाऊन पाहणी केली. सदर महिलेच्या संपर्कातील बारा हाय रिस्क नागरिकांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर लो रिस्कमधील १८ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जामगाव-चंद्रपूर रस्ता कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.