सिन्नरला नवे २२ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:53+5:302020-12-11T04:41:53+5:30
----------------- पास्तेच्या शेतकऱ्यांचे वीज वितरणला निवेदन सिन्नर : तालुक्यातील पास्ते व जामगाव या दोन गावांमध्ये रात्री ८ ते सकाळी ...
-----------------
पास्तेच्या शेतकऱ्यांचे वीज वितरणला निवेदन
सिन्नर : तालुक्यातील पास्ते व जामगाव या दोन गावांमध्ये रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरावे लागते. गावाजवळच जंगल असून, या भागात नेहमी बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी घाबरतात. विजेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी वीज वितरणकडे करण्यात आली आहे. निवेदनावर माजी सरपंच नवनाथ घुगे, भाऊलाल घुले, चंद्रकांत घुले, त्र्यंबक घुले यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------
अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
सिन्नर: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सिन्नर बायपासजवळ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल रामदेव बाबाजवळ पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहनाने होंडा मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने या अपघातात अतुल अंबादास वारे, रा. श्रीकृष्णनगर, पंचवटी हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
---------------------
आग लागून संसारोपयोगी वस्तू खाक
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील बन्सी आव्हाड यांच्या शेतातील कमल उघडे यांच्या पत्र्याच्या शेडवजा घराला आग लागून मोटारसायकलसह धान्य, संसारोपयोगी वस्तू व रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज जळून खाक झाला. युवा नेते उदय सांगळे यांनी या आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
--------------------
तंट्यामामा भिल्ल यांना आदरांजली
सिन्नर : येथील महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने आद्यक्रांतिकारक तंट्यामामा भिल्ल यांना १३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. तंट्यामामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तंट्यामामांनी १८७८ ते १८८९ या कालखंडात मध्य प्रदेशच्या सातपुडा भागात टोळी उभारून सावकार, जमीनदार, इंग्रज, पैसेवाले यांच्याविरोधात बंड पुकारल्याचे दत्ता वायचळे यांनी सांगितले. विजय मुठे यांनी सूत्रसंचालन केले. रामू इदे यांनी प्रास्ताविक केले. नवशीराम साबळे यांनी आभार मानले.