सिन्नरला व्यावसायिकांनी पाळला अंशत: लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:05+5:302021-03-14T04:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये व्यावसायिक व नागरिकांनी अंशत: लॉकडाऊन पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये व्यावसायिक व नागरिकांनी अंशत: लॉकडाऊन पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवडाभरात सिन्नर तालुक्यात शंभरच्या आसपास कोरोना रुग्ण आढळले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी आपल्या आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सिन्नरच्या व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. शनिवारी शहरातील किराणा दुकान, मेडिकल, रुग्णालये व अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना सुरु होत्या. कापड, भांडे, फर्निचर, हॉटेल्स् व अन्य दुकानदारांनी शंभर टक्के आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. दुसरा शनिवार असल्याने बॅँका व पतसंस्थाही बंद होत्या, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. महाविद्यालये, शाळा व क्लासेस सुरु असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ काही प्रमाणात होती. बसस्थानकात प्रवाशांची नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली. नगर परिषद प्रशासनाने शहरातून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती दिली होती. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. हे अंशत: लॉकडाऊन शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पाळले जाणार आहे. दरम्यान, सिन्नर येथे भरणारा शनिवार आणि रविवारचा आठवडा बाजारही बंद ठेवण्यात आला आहे.
---------------------------
वावीकरांनीही पाळला बंद
सिन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या वावी येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत शनिवारी अंशत: लॉकडाऊनच्या निर्णयाचे पालन केले. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे वावीच्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. ग्रामपंचायत प्रशासनाने ध्वनीप्रेक्षकावरुन मंगळवारचा आठवडा बाजार बंद राहणार असल्याची सूचना दिली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी मंगळवारच्या आठवडा बाजारासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.