साहेब, एकतरी ऑक्सिजन बेड द्या, नाहीतर त्यांचा जीव जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:45+5:302021-04-25T04:14:45+5:30
नाशिक : ‘साहेब, एक ऑक्सिजन बेड द्या, दोन दिवसांपासून फिरतोय, वडिलांची स्थिती गंभीर आहे. आता बेड नाही मिळाला तर ...
नाशिक : ‘साहेब, एक ऑक्सिजन बेड द्या, दोन दिवसांपासून फिरतोय, वडिलांची स्थिती गंभीर आहे. आता बेड नाही मिळाला तर त्यांचा जीव जाईल’, ‘साहेब, एकच जनरल बेड द्या, तीन दिवसांपासून सगळीकडे फिरतोय...’ असे रूग्णांच्या नातेवाईकांचे आर्जव महापालिकेच्या हेल्पलाईन आणि वॉर रूममध्ये ऐकण्यास मिळतात. कित्येकदा रूग्णांचे नातेवाईक अगतिक होतात. ‘तुम्ही सांगितलेल्या एकाही हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली नाही, बंद करून टाका ना वॉर रूम’, असेही तावातावाने म्हणतात.
नाशिकमध्ये सध्या कोरोनामुळे गंभीर स्थिती आहे. शक्य तेवढे दिवस घरीच रूग्णांना ठेवावे लागते. परंतु, तपासणीत स्कोर वाढला किंवा ऑक्सिजन लेव्हल कमी झाली की, कुटुंबातील सदस्य धावपळ सुरू करतात. नजीकच्या ओळखी-पाळखीच्या ठिकाणी बेड मिळत नसले की, थेट महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क करतात. महापालिकेने मध्यवर्ती बेड प्रणाली सुरू केली आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या मुख्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. मात्र, ती कमी पडू लागल्याने आता सहा विभागात सहा वॉर रूम सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिक याठिकाणी संपर्क साधतात, काहींना बेड मिळतात काहींना नाही. कित्येकदा नागरिक अगतिक असतात, कित्येकदा संतापही व्यक्त करतात.
इन्फो...
१ चोवीस कर्मचाऱ्यांची वॉर रूम
महापालिकेने सहा विभागात सहा वॉर रूम तयार केल्या आहेत. त्यात एका वॉर रूमध्ये चार कर्मचारी आहेत. त्यात एक फार्मासिस्ट, एक शिक्षक, एक कार्यकर्ता आणि एक ऑडिटर यांचा समावेश आहे. संगणकीय प्रणालीमुळे कोणत्या रूग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, याची रियल टाईम माहिती मिळते.
२ महापालिकेच्या मुख्यालयातही मध्यवर्ती कक्ष आहेत. विभागीय वॉर रूममध्ये माहिती थेट उपलब्ध न झाल्याने तेथील कर्मचारी थेट मुख्यालयात संपर्क साधतात. तेथून त्यांना ॲडमिशनसाठी टोकन जनरेट हेाते आणि ते रूग्णालय तसेच रूग्णांना कळवले जाते. त्यातूनही रूग्णांना बेड मिळत आहे.
कोट...
महापालिकेने सहा विभागात वॉर रूम तयार केल्या आहेत. नागरिक तणावात असतात आणि त्यामुळे कधी कळवळून तर कधी रोषही व्यक्त करतात. परंतु, त्यांना शांततेत उत्तर दिले जाते. पंधरा दिवसात सुमारे अडीचशे बेड रूग्णांना उपलब्ध करून दिले आहेत.
- सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
इन्फो...
सारेच अपुरे...
महापालिकेच्या वॉर रूममध्ये दिवसाला सुमारे तीनशे फोन येतात. कर्मचाऱ्यांना सहकार्य कराचयी इच्छा असून काय करणार, जनरल बेड नाही, ऑक्सिजन बेड नाही आणि व्हेंटिलेटर तर नाहीच. अशावेळी कर्मचाऱ्यांना काय करायचे, असा प्रश्न पडतो. परंतु, तरीही संयमाने उत्तर देऊन ते वेळ निभावून नेतात.
इन्फो....
कोणाला ऑक्सिजन बेड हवा तर कोणाला रेमडेसिविर इंजेक्शन
महापालिकेच्या हेल्पलाईनवर दररोज खासगी रूग्णालयात बेड्स शिल्लक आहेत का, याबाबत चौकशी आणि मदत मागण्यासाठी सर्वाधिक फोन येतात. परंतु, केवळ त्यासाठी नाही अन्य कामांसाठीही अनेकजण संपर्क साधतात.
कोरोनाबाधिताला ऑक्सिजन बेड मिळत नाहीये परंतु ऑक्सिजन सिलिंडर तरी कोेठे मिळेल का? केवळ एक इंजेक्शन द्या, अशी मागणी केली जाते. कारण शहरात ऑक्सिजनचाही ठणठणाट आहे.
शहरात रेमडेसिविरचीही टंचाई सुरू असून, त्यामुळे आता रेमडेसिविरसाठीही महापालिकेला फोन येत आहेत. मुळात ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर महापालिकेच्या अखत्यारित येत नाही. परंतु, तरीही हेल्पलाईनवर चौकशीसाठी लोक फोन करतात.
---------
फोटो..आर फोटाेवर २४ वॉर रूम....