साहेब, कोरोनामुळे नव्हे तर पीपीई कीटने मरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:36+5:302021-04-05T04:13:36+5:30
गेल्यावर्षी कोरोनाचे महासंकट आल्यानंतर अत्यंत वेगाने घातक पद्धतीने पसरणाऱ्या या रोगावर मात करण्यासाठी साधने नव्हती. विशेषत: बाधितावर उपचार करणे ...
गेल्यावर्षी कोरोनाचे महासंकट आल्यानंतर अत्यंत वेगाने घातक पद्धतीने पसरणाऱ्या या रोगावर मात करण्यासाठी साधने नव्हती. विशेषत: बाधितावर उपचार करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच होते. त्यावेळी पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट म्हणजे पीपीई किटची चर्चा झाली होती. आता ते बऱ्यापैकी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी त्याचा वापर सहज सोपा नाही. आठशे ते हजार रुपयांना मिळणारे हे किट शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांत वापरले जाते. मात्र ते महाग असल्याने एकदा घातलेलेे पीपीई किट त्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्याशिवाय काढता येत नाही. हे किट घालण्याची आणि बाहेर काढून ठेवण्याची ही सुरक्षित पध्दतीदेखील आहे. परंतु दिवसभर एवढे जाड कीट आणि तेही सध्या ३६ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान असताना वापरणे सोपे नाही. सतत घाम, त्यात पाणी पीता येत नाही की काही खाता येत नाही, नैसर्गिक विधीदेखील करणे कठीण आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
कोट...
पीपीई कीट वापरणे आवश्यक असले तरी त्यामुळे अनेक अडचणी येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जाडे भरडे कीट घातल्याने प्रचंड घाम येतो. आणि त्यामुळे अंगावर रॅश येतात. सतत घामामुळे केस गळत आहेत. नाइलाज म्हणून हे किट वापरावे लागत आहे.
- परिचारिका, बिटको रुग्णालय
कोट...
किट घातल्यानंतर ते आठ तास काढता येत नाही. उन्हाळा वाढत असल्याने पाणी प्यायचे तरी ते नीट घेता येत नाही. त्यातच हातात ग्लोव्ह्जदेखील असतात. त्यामुळे खूप अडचणी येतात. लघुशंकेलासुध्दा सहा तास जाता येत नाही. एकदा किट काढले की पुन्हा ते चढवता येत नाही, परिणामी अडचण होत आहे.
-वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय
कोट...
पीपीई किट घातल्यानंतर जीव गुदमरतो. एसी नसलेल्या कोरोना कक्षात तर अत्यंत बिकट अवस्था होते. सामान्य नागरिक काही वेळ मास्कही पूर्ण वापरू शकत नाही. मात्र, आम्हा कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र हे वजनदार किट अडचणींचा सामना करून वापरावे लागत आहे.
- वॉर्डबॉय, झाकीर हुसेन रुग्णालय
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोट...
पीपीई किटमुळे कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येतात हे खरे आहे. उन्हाळा कडक असल्याने अशा स्थितीत पीपीई किट घालावे लागते. त्यामुळे दहा मिनिटात सर्वच घामेघुम होतात. गॉगल, हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि किट हे अडचणीचे ठरत असले तरी या सुरक्षासाधनांशिवाय पर्याय नाही. ते अनिवार्यच आहे.
- डॉ. रावते, वैद्यकीय अधिकारी, झाकीर हुसेन रुग्णालय
इन्फो...
१,२१,२४४ एकूण बाधित
१७४७२ उपचार सुरू
१,०२,६०६ बरे झालेले रुग्ण
१, १६६ कोरोनाचे एकूण बळी
--------
५५० सुमारे पीपीई किट्सचा दररोज होतो वापर