नांदूरशिंगोटेत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:59 PM2019-06-02T18:59:33+5:302019-06-02T19:00:18+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने बहीण भावासह तीघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमध्ये दहा व चौदा वर्षाचा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नांदूरशिंगोटे येथे माळ नंबर ५०७ परिसरात इंद्रभान दराडे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. रविवार (दि.२) रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या वैशाली दराडे (१४) व गणेश दराडे (१०) या बहीण भावावर अचानक मोकाट कुञ्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य भारत दराडे व ग्रामस्थांनी उपचारासाठी सिन्नर येथून नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नांदूरशिंगोटे येथे शहरातून मोकाट कुत्री आणून सोडली जातात. परंतू अशी मोकाट कुत्री लहान मुले, वृध्द यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे गावात दहशत पसरली आहेत. यापूर्वीही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालके जखमी झाल्याच्या घटना गावात व परिसरात घडल्या आहेत. दरम्यान मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दराडे भाऊ-बहीण जखमी झाले असून वैशाली हिंच्या दोन्ही हाताला तसेच पायाला व गणेश याच्या कमरेच्या खाली व हात, पाय आदि ठिकाणी लचके तोडले. वैशालीने हिम्मत दाखवत आपल्या भावाला कुञ्याच्या तावडीतून सोडवले. त्यांनी आरडाओरड केल्यानतंर परिसरातील ग्रामस्थ गोळा झाले. पुढील उपचारासाठी तात्काळ नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.