मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या अन घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:34+5:302021-05-26T04:15:34+5:30
नाशिक : शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर जितेंद्र भावे यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी ''ऑपरेशन हॉस्पिटल'' चळवळीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पोलीस ...
नाशिक : शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्यासमोर जितेंद्र भावे यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी ''ऑपरेशन हॉस्पिटल'' चळवळीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पोलीस प्रशासनाच्या कारवाईबाबत घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. जमाव पोलीस ठाण्यासमोरून जात नसल्याने अखेर दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी जमा केलेली अनामत रक्कम परत न करण्याचा पवित्रा रूग्णालय प्रशासनाने घेतल्यानंतर ''ऑपरेशन हॉस्पिटल'' या सोशल मीडियावरील चळवळीचे कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी मंगळवारी दुपारी रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. तसेच रुग्णाच्या नातेवाईकासोबत स्वतःच्या अंगावरील कपडे उतरवून अर्धनग्न पद्धतीने ठिय्या आंदोलन केले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने अनामत रक्कम देण्यास तयारी दर्शविली. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना दुपारी ताब्यात घेतले. याबाबत सोशल मीडियावर माहिती वायरल होताच मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली. संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुमारे तीन तास पोलीस ठाण्याबाहेर शेकडोंच्या संख्येने नागरिक ठिय्या देऊन होते. भावे यांना पोलीसांनी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी यावेळी जमावाने केली. पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार ध्वनिक्षेपकावरून आवाहन करत होते मात्र जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. यावेळी सामाजिक व पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मुकुंद दीक्षित यांनीही घटनास्थळी येत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी घटनास्थळी हजर होत त्वरित दंगल नियंत्रण पथकाच्या तुकडीला पाचारण केले. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पथक दाखल होताच जमाव पांगला आणि पोलीस ठाण्याबाहेर तीन तासांपासून सुरु असलेला गोंधळ संपला.
दरम्यान, पोलिसांनी भावे यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. यांच्यावर कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या प्रकरणात संबंधित रुग्णालय प्रशासनाने आपली काहीही तक्रार नसल्याचे लेखी स्वरूपात म्हणणे पोलिसांना दिल्याचे खन्ना यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी पातळीवर पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी एका रुग्णालयात केलेले वर्तन लक्षात घेत कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----
कोट.
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. यामुळे अशाप्रकारे एका रुग्णालयात सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे कपडे उतरवून अर्धनग्न होऊन चमकोगिरी करणे गैर आहे. तसेच कोविड साथ सुरू असून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. या स्थितीत असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालणाऱ्या नागरिकांवरही ओळख पटवून कारवाई करण्यात येईल.
-दीपक पांडेय, पोलीस आयुक्त