पुण्याहून येणाऱ्या नाशिककरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:32 AM2018-07-31T01:32:37+5:302018-07-31T01:33:16+5:30
पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले.
नाशिक : पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले. सायंकाळी स्थानिक आमदारांच्या मदतीने पुन्हा पुणे येथे पाठविण्यात आले तर नाशिककडून पुण्याला जाणा-या प्रवाशांना वाहने माघारी फिरवावी लागली. नाशिक-मुंबईप्रमाणेच नाशिक आणि पुणे मार्गावरून रोज शेकडो नागरिक कामानिमित्त ये-जा करीत असतात. मराठा आंदोलकांनी सोमवारी (दि.३०) चाकण परिसरात मोठे आंदोेलन केले. अनेक मोटारी फोडण्यात आल्यामुळे पोलिसांना संचारबंदी करावी लागली. सकाळी शिवाजीनगरहून निघालेल्या तीन शिवशाही बस चाकणपर्यंत आल्या. परंतु आंदोलनामुळे त्या फसल्या. आंदोलकांनी आंदोलने करताना शिवशाहीला मात्र वगळले असल्याने त्यांना दिलासा मिळाला. परंतु कोेंडीत अडकल्याने त्यांना काहीच करता येत नव्हते. यावेळी परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकारी व चालकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या खाडे हॉस्पिटलच्या हॉलमध्ये सुरक्षित ठेवले. दरम्यान, नाशिकमधील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे व त्यांच्या सहकाºयांनी चाकण येथील मराठा कार्यकर्त्यांना कळविल्यानंतर त्यांनी मदत देण्याचा प्रयत्न केला. परंतु संचारबंदीमुळे कार्यकर्ते तेथे पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी संपर्क साधून बस सुरक्षीतरीत्या तेथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, चाकण येथील स्थानिक शिवसेना आमदार सुरेश गोºहे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रवाशांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवशाही परत माघारी शिवाजीनगरपर्यंत नेण्यात आल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.