झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 09:32 PM2020-03-04T21:32:45+5:302020-03-04T21:33:09+5:30
झोडगे : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्रास दिला जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

निवेदनात म्हटले आहे की, झोडगे येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिका मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे रूग्णांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्यातील डॉक्टर रात्री - अपरात्री गरोदर महिलांना सोयसुविधा उपलब्ध करुन देत नाहीत, शिवाय अरेरावी करतात. गावात शासकीय रूग्णालयाची सुविधा असतांनाही नाईलाजास्तव गरोदर महिलांना प्रसुतीसाठी खासगी रूग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे.
शासनाच्या विविध योजना असून त्याचा कोणताही लाभ झोडगे
ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गावातील रूग्णांना मिळवून देत नाही. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका गैरहजर असतात. ग्रामीण भागात सर्पदंश, विंचू दंश, विषारी औषधांच्या फवारणीमुळे होणारा त्रास यासारख्या घटना घडतात. येथे कुठलीही औषधे उपलब्ध नसल्यामुळे सरकारी दवाखाना असूनही ते शोभेचे बाहुले झाले आहे. मालेगावी जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्यामुळे रूग्णांचे हाल होतात. सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे जास्तीचे पैसे देवून खासगी रूग्णालयात प्रसुती करावी लागते.