जायकवाडीसाठी साडेसहा टीएमसी पाणी रवाना
By संकेत शुक्ला | Published: August 4, 2024 07:05 PM2024-08-04T19:05:23+5:302024-08-04T19:05:38+5:30
चोवीस तासांत दोन टीएमसी : जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच
नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ४ ऑगस्टपर्यंत तब्बल साडेसहा दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले असून, गेल्या चोवीस तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे सुमारे दोन टीएमसी (दलघफू) पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे सुमारे ५ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे रविवारी (दि.४) रात्री ८ वाजेपासून ८००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील कडवा धरणातून आतापर्यंत १ टीएमसी, दारणातून ५.२ टीएमसी, भाममधून १.७ टीएमसी याशिवाय भावली धरणासह गोदावरी कालव्यांमधून एकत्रित ६.४६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, त्र्यंबक, इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. हवामान खात्याने अजूनही दोन दिवस अलर्ट दिला असून, विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सुरू असलेला विसर्ग...
धरण (क्युसेक)
दारणा २२,९६६
भावली १,२१८
कडवा ८,२९८
भाम ४,३७०
पालखेड ५,५७०
नांदूरमध्यमेश्वर बंधारा : ४४,७६८
गंगापूर ८,०००
होळकर पूल : २,२२७