शहरातील सहा विभागांत ‘देवराई’च्या जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:48 AM2019-01-23T00:48:39+5:302019-01-23T00:48:55+5:30
शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभे राहणार आहे.
नाशिक : शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभे राहणार आहे.
शहरातील हवा प्रदूषित होत असते. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. परंतु त्यात पुरेसे नियोजन नसते. यासंदर्भात यंदा मात्र महापालिकेच्या उद्यान विभागाने विशेष नियोजन केले असून, शहरातील सहाही विभागांत आॅक्सिजन हब उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सामान्यत: ग्रामीण भागात आध्यात्मिक महत्त्व असलेल्या देवराईच्या धर्तीवर नाशिक शहरात उद्यान विभाग ब्लॉक प्लॅँटेशन करून देवराई फुलवणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध जागांची तपासणी केली होती. त्यानंतर आता नाशिक पश्चिम विभागात गायकवाड मळा, पूर्व नाशिकमध्ये उपनगर येथील मातोश्रीनगर, नाशिकरोड येथील इंगळेनगर, पंचवटीत तांबोळीनगर आणि सातपूर विभागात संभाजी व्यायामशाळा परिसराची निवड करण्यात आली आहे. सिडको विभागातील दोन जागा प्रस्तावित असून, त्यासंदर्भात मात्र जागेची अंतिम निवड होणे बाकी आहे.
शहरातील विविध सेवाभावी पर्यावरण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या संस्थांची यासंदर्भात बैठक सोमवारी (दि. २१) आयोजित करण्यात आली होती. उपआयुक्त शिवाजी आमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता. या संस्थांना देवराईच्या दहा वर्षे संवर्धनासाठी या सेवाभावी संस्थांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सातपूर विभागात पतंजली, पश्चिम नाशिक विभागात सिलीकॉन व्हॅली, पूर्व नाशिक विभागात ग्रीन रेव्हल्युशन, नाशिकरोड आणि पंचवटी विभागात आर्ट आॅफ लिव्हिंगने जबाबदारी घेतली आहे. सिडकोतील जागा निश्चितीनंतर तेथील सेवाभावी संस्थेचीदेखील जागा निश्चित केली जाणार आहे.
सदरच्या जागेत देशी प्रजातीची झाडे लावून शहरात प्राणवायू वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, त्यात सेवाभावी संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.