सहा वटवृक्षांना मिळणार ‘हेरिटेज’चा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:08+5:302021-06-24T04:12:08+5:30
जुन्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून ते कायमस्वरूपी जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून अशा वृक्षांना ‘हेरिटेज’चा दर्जा देण्याचे ...
जुन्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून ते कायमस्वरूपी जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून अशा वृक्षांना ‘हेरिटेज’चा दर्जा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार सामाजिक वनीकरण विभागाकडून काही महिन्यांपूर्वीच शहरासह जिल्ह्यात असलेल्या जुन्या वृक्षांचा शोध घेऊन त्यांचे सर्वेक्षण सुरु केले गेले. यामध्ये वृक्षाची प्रजाती, आकारमान, साधारण वय, वृक्षाशी निगडित एखादी आठवण, आख्यायिका यानुसार माहिती संकलन केली गेली आहे. नाशिक शहरामधील तसेच शहराजवळच्या काही खेड्यांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे नाशिक वनक्षेत्रपाल प्रदीप कदम यांनी तयार केलेल्या प्रस्तावात कडुलिंब, पिंपळ, वड, चिंच यांसारख्या नऊ ते दहा जुन्या वृक्षांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सहा वटवृक्षदेखील आहेत.
-इन्फो--
उंटवाडीचा वटवृक्ष दाेनशे वर्षे जुना
उंटवाडी रस्त्यावरील नंदिनी नदीच्या काठावर म्हसोबा मंदिराभोवती वाढलेला महाकाय वटवृक्ष सुमारे दोनशे वर्षे जुना असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. या वृक्षाचा वेढा हा ९.२५ मीटर इतका तर उंची २५ मीटरपर्यंत असल्याची नोंद करण्यात आली आहे. वडाखाली असलेले म्हसोबा महाराज देवस्थान हे अतिप्राचीन असल्याची आख्यायिकेच्याही अहवालात उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या आवारातसुध्दा अत्यंत जुने आणि विशाल वडाची झाडे पहावयास मिळतात.
--इन्फो--
पंचवटीतील पाच वड शंभरी पार
गोदावरी नदीच्या काठावर पाच वडांच्या झाडांचा बगीचा असा उल्लेख रामायणात करण्यात आलेला आहे. या पंचवटी परिसरात असलेली पाच वडांची झाडे सुमारे शंभर वर्षांपेक्षा अधिक वयाची असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. येथील एक वड सर्वाधिक २२ मीटर उंचीचा तर एक १६ मीटर उंचीचा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रभू श्रीराम वनवासकाळात पंचवटीत वास्तव्यास होते अशी आख्यायिका असून रामायणात तसा उल्लेखही असल्याची नोंद या अहवालामध्ये करण्यात आली आहे.