बारा फ्लॅटच्या इमारतीत मनपाने वाढविले सहा फ्लॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:48 AM2018-12-19T00:48:34+5:302018-12-19T00:48:49+5:30
कायदेशीर इमारतीला बेकायदेशीर ठरविले, भागश: पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या सदनिकाधारकांवर अख्ख्या इमारतीचा कर बोजा टाकणे इतकेच नव्हे तर शंभर वर्षांपूर्वीच्या लाकडी वाड्याला सीमेंटचे बांधकाम ठरविणे, असे अनेक कारनामे करणाºया महापालिकेने खासगी एजन्सीच्या सर्वेक्षणावर विश्वास ठेवून या सर्वांवर कळस ठरेल,
नाशिक : कायदेशीर इमारतीला बेकायदेशीर ठरविले, भागश: पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या सदनिकाधारकांवर अख्ख्या इमारतीचा कर बोजा टाकणे इतकेच नव्हे तर शंभर वर्षांपूर्वीच्या लाकडी वाड्याला सीमेंटचे बांधकाम ठरविणे, असे अनेक कारनामे करणाºया महापालिकेने खासगी एजन्सीच्या सर्वेक्षणावर विश्वास ठेवून या सर्वांवर कळस ठरेल, अशी कामगिरी केली आहे. भाभानगर येथील एका इमारतीत १२ फ्लॅट असताना १८ फ्लॅट असल्याचे दाखवत दंडासह घरपट्टी आकारण्याची नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या या कारनाम्यामुळे मात्र संबंधित विकासक अडचणीत आला असून, सहा अतिरिक्त फ्लॅट आणले कोठून असा प्रश्न करीत त्याने आक्षेप नोंदवला आहे. ज्या मिळकतींना घरपट्टीच लागू नाही अशा ६२ हजार मिळकती शोधून काढल्याचा धाडसी दावा महापालिकेच्या प्रशासनाने काही वर्षांपूर्वी केला होता. आता या मिळकतीच्या मालकांकडून सहा वर्षे मागे जाऊन तिप्पट घरपट्टी आकारण्याचे आणि त्यामाध्यमातून महापालिकेची तिजोरी भरण्याचे मनसुबे रचले जात आहेत, परंतु त्याचा पायाच किती कच्चा आहे हे यानिमित्ताने उघड होत आहेत.
भाभानगर येथील सर्व्हे क्रमांक ५१२/३ प्लॉट नंबर ६ व ७ वर एक इमारत २००० सालापूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीत बारा सदनिका असून, त्यापैकी सहा सदनिकांना भागश: पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संबंधित मालक त्याची घरपट्टी नियमितपणे भरत असताना महापालिकेने त्यांना नोटीस बजावली असून, १८ सदनिकांची घरपट्टी ७४ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. ज्या इमारतीत बारा सदनिका आहेत ते अचानक बारा आभासी घरे कोणी बांधली असा प्रश्न संबंधिताना पडला आहे. विशेष म्हणजे सर्व सदनिकांची क्षेत्रफळे वेगवेगळी दाखवली असून, त्यामुळे हा आणखीनच बुचकळ्यात टाकण्याचा प्रकार ठरला आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिसीत रिपोर्टनुसार असा उल्लेख आहे, परंतु असा कोणता रिपोर्ट आणि तो कोणी सादर केला ते माहिती नाही.
अशाच प्रकारे अशोकस्तंभावरील डॉक्टर हाउसमधील एका हॉस्पिटलच्या बोकांडी संपूर्ण इमारतीपोटी नऊ लाख रुपयांची घरपट्टी भरण्याची मागणी केल्याने संबंधित व्यावसायिकाची डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.
सर्व्हेच नाही : जागामालकांनी केला प्रश्न
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षांत या इमारतीत महापालिकेच्या वतीने कोणी सर्व्हे केला नाही की, कोणाकडे बांधकामाचे नकाशे मागितले नाही. त्यामुळे महापालिकेचे हे रेकॉर्ड कोणी आणि कसे केले असा प्रश्न मिळकतधारकाने केला आहे. या मिळकतीला २०११ मध्ये पूर्णत्वाचा दाखला मिळाला तेव्हापासून मिळकतधारक नियमितपणे घरपट्टी भरत असताना महापालिकेने १ एप्रिल २०१२ पासून कर आकारणी केल्याने अगोदर भरलेल्या कराचे काय करायचे, असा प्रश्न जागा मालकाने केला आहे.