परिवहन आयुक्त ढाकणे यांची सहा तास चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:19+5:302021-05-31T04:12:19+5:30
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह आरटीओंच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांवर पदोन्नतीच्या बदल्यांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सुमारे १४ ...
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह आरटीओंच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांवर पदोन्नतीच्या बदल्यांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सुमारे १४ पानी तक्रार याच खात्यातील वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीमध्ये करण्यात आलेले आरोप आणि ज्या व्यक्तींचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये नामोल्लेख केला गेला आहे, त्या व्यक्तींचे पदे लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित सात अधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ढाकणे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती.
--इन्फो--
ढाकणे यांची दिवसभर चौकशी
शनिवारी सकाळी शहरातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात ढाकणे हजर झाले. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची याप्रकरणात चौकशी करत जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहार व आदेशांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचेही आदेश दिले आहेत. सोमवारपर्यंत या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गुन्हे शाखेकडे जमा केले जाणार आहेत.
---इन्फो--
कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा ढाकणे यांच्यावर आरोप
संगणकीय अभिलेख अद्ययावत करणे गरजेचे होते; मात्र १९९७ ते २०२०सालापर्यंत तसे झाले नाही. यामुळे करवसुली करता येत नसल्याने त्याचा फायदा थेट दलाल आणि गाडीमालकांना करून देत शासनाचा महसूल बुडविला जात असून यास ढाकणे जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचे ऑडिट झाल्यास कोट्यवधींचा महसूल आतापर्यंत पाण्यात गेल्याचे लक्षात येईल, असाही दावा पाटील यांनी केला आहे. संकेतस्थळावर दाखविली जाणारी एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या आणि लायसन्सची संख्या यामध्ये कमालीची तफावत असल्याचाही उल्लेख आकडेवारींसह करण्यात आला आहे.
---इन्फो--
वर्षभरात लाटले दीडशे कोटी?
आरटीओ विभागात गेल्या वर्षभरात सर्व बदल्यांमधून पदोन्नती व पदस्थापनेच्या माध्यमातून आणि भरती प्रक्रियेद्वारे सुमारे दीडशे कोटींपेक्षाही अधिक रकमेचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये शंभर कोटी रुपये अनिल परब यांच्यापर्यंत तर उर्वरित पन्नास कोटी वर्धाचे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांनी गिळंकृत केल्याचे आरटीओ अधिकारी संघटनेच्या ३ मार्च २०२१च्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयातील परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे यांच्यावरही भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेली सहा वर्षे ते याच विभागात ठाण मांडून असून त्यांची बदली का होत नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावरसुद्धा करण्यात आला आहे.