सहा लाखांचा गुटखा मुंबई नाका पोलिसांकहून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 03:14 PM2019-09-01T15:14:04+5:302019-09-01T15:16:10+5:30
अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली.
नाशिक : राज्य शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटख्याची शहरात सर्रासपणे अवैध वाहतूक केली जाणार असल्याची खात्रिशीर गुप्त माहिती मुंबईनाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर येथे उड्डाणपूलावर सापळा रचला. संशयास्पद पांढऱ्या रंगाची पीक-अप जीप पूलावरून मार्गस्थ होत असताना पोलिसांनी रोखली. जीपची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ६ लाख रूपयांचा रंगबाज पान मसाला गुटख्याचे पोते आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे, यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरिक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाणपूलावर एक पांढ-या रंगाची जीप (एम.एच१५ डीके ४३५२) मुंबईकडून आली. या जीपवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी ती रोखून झडती घेतली असता जीपमध्ये पांढºया रंगाच्या पोत्यांमध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. सुमारे ६ लाख रूपये किंमतीचा हा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख (३३,रा.पाथर्डीफाटा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ४ लाख रूपयांचे वाहनदेखील जप्त केले आहे. एकूण १० लाख रूपयांचा मुद्देमाल या गुन्ह्यात पोलिसांनी हस्तगत केला असून संशयित शेखविरूध्द अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.