पालखीसाठी पंचायत समितीचे सहा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:58 AM2018-06-30T00:58:25+5:302018-06-30T00:58:57+5:30
शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला.
नाशिक : शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला. अर्थात, यावेळी नाशिक पंचायत समितीतर्फे सहा लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती देण्यात आली, तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही संताची शिकवण सांगून टोलेबाजी केली. त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ महाराजांसह तुकाराम माउलींच्या नामस्मरण करण्यात आलेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एका वक्त्याने पालखी स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीने सहा लाख रुपये दिल्याची जाणीव करून दिली. त्यावर महापौर रंजना भानसी यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी पालखीचे स्वागत केल्याचा आनंद होत असल्याचे नमूद केले, तर हा सोहळा पंचायत समितीच्या ठिकाणी घेण्यास कारणीभूत ठरलेले पडद्यामागचे सूत्रधार म्हणून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी स्वागत सोहळ्याच्या वादाचा सुरुवातीसच उल्लेख केला. गेल्या काही दिवसांपासून हा विषय गाजत असला तरी त्यावर पालखी स्वागत सोहळा समितीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि आपणही दिली नाही. ही संत शिकवणीची परंपरा असल्याचे नमूद केले. यावेळी बाळासाहेब सानप, जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पद्माकर पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी दिंंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्यवरांनी आश्वासन दिले.
स्वागत व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी केले. आभार सचिन डोंगरे यांनी केले. यावेळी त्र्यंबकराव गायकवाड, भारत ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पंढरपूर येथे केलेल्या हागणदारीमुक्त कामाची माहिती दिली. या कामामुळे आपल्याला देशभरातून सहाशे ते सातशे पत्र आले व त्यांनी चंद्रभागा नदी घाणीपासून मुक्त केल्याबद्दल आभार मानल्याचे सांगितले, तर जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख यांनी आपण पंढरपूर येथे सेवा बजावली आणि आता संत निवृत्तिनाथांच्या नगरीत आल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पांडुरंगाच्या चरणी नाशिक जिल्ह्यात पाऊस पडू दे, अशी विनवणी करण्याचे आवाहन केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकरी नाशिक जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण देशातच आहे. शिवाय जगभरात पाऊस पडून समृद्धी राहो अशी प्रार्थना करण्याची सूचना केली.