आवारे यांच्यासह सहा जणांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:02+5:302021-04-24T04:14:02+5:30
सिन्नर : मुसळगाव येथील ‘स्टाइस’ अर्थातच सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेचे संचालक नामकर्ण आवारे यांच्यासह सहा संचालकांनी सामूहिक राजीनामे ...
सिन्नर : मुसळगाव येथील ‘स्टाइस’ अर्थातच सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेचे संचालक नामकर्ण आवारे यांच्यासह सहा संचालकांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे समजते. त्यामुळे सिन्नरच्या उद्योग वर्तुळात निवडणुकीचे वेध लागले आहेत. सहकार खात्याच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या संस्थेवर पाच वर्षांपूर्वी नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झालेली होती. संस्थेचे एकूण तेरा संचालक आहेत. मात्र, तीन वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडली. दोन्ही गटांमध्ये सहा-सहा असे संचालक विभागले गेले. चेअरमन पंडित लोंढे, अविनाश तांबे यांचा एक तर नामकर्ण आवारे यांचा दुसरा गट पडला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून संस्थेतील वातावरण दूषित झालेले आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगसाठी सात संचालकांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याने बैठकाही होत नाहीत. परिणामी कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आवारे यांच्यासह अरुण चव्हाण, प्रभाकर बडगुजर, पद्मा सारडा, चिंतामण पगारे, संदीप आवारे या सहा संचालकांनी राजीनामे दिल्याचे समजते.
--------------------------
कोविडसारख्या महामारीच्या संकटात काही उद्योजकांनी जीव गमावला आहे. अशा संकटात स्टाइस प्रशासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उद्योजकांना मदत करण्याचे सोडून राजीनाम्यांच्या आडून त्यांना राजकारण करण्याचे सुचते आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.
- अविनाश तांबे, माजी चेअरमन, स्टाइस