नाशिकमध्ये २० शाळांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा जिल्ह्यातून सहा शाळांचे प्रस्ताव : दोन ‘ओजस’ शाळा करणार १८ ‘तेजस’ शाळांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:13 AM2018-01-01T01:13:58+5:302018-01-01T01:14:42+5:30
नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे.
नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे २० शाळांना येणाºया नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने राज्यभरात १० ‘ओजस’ आणि ९० ‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आंतराराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी सहा शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून या शाळांना मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यात कोकण (मुंबई वगळून), पुणे (पुणे शहर वगळून)- प्रत्येकी एक, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर- प्रत्येकी दोन ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती केली जाणार आहे. या शाळा त्यांच्या परिसरातील अन्य नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत करतील. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातीन दोन ओजस शाळा अन्य १८ शाळांनाही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याने जिल्ह्यात एकूण २० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या प्रत्येकी दोन तुकड्यांसाठी पहिली ते पाचवीसाठी ३००, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी १६० विद्यार्थी अपेक्षित असून, किमान एक हजार पटसंख्या सामावण्याची क्षमता आवश्यक आहे. एखाद्या विभागात दोन तुकड्यांच्या शाळांनी अर्ज न केल्यास एक तुकडी असलेल्या शाळांना प्राधान्य दिले जाणार असून, गेल्या काही वर्षांत शाळेतील पटसंख्येत झालेली वाढ आणि शाळेत परिसरातील गावांमधून आपल्या गावातील शाळेऐवजी या शाळेत येणारे विद्यार्थी, शाळेतील शिक्षकांची इच्छा आदींचा विचार करून शिक्षण आयुक्त संबंधित शाळेच्या पटसंख्येची अट शिथिल करण्यास मान्यता देणार आहेत. या निकषांचा अभ्यास करून नाशिक जिल्ह्यातून तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकाºयांनी शाळांची तपासणी करून सहा शाळांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे पाठविले असून, यातील दोन शाळांची ओजस शाळा म्हणून निवड होणार आहे.