सहा संशयितांना आठ दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:47 AM2019-01-30T00:47:04+5:302019-01-30T00:47:28+5:30
जेलरोड चंपानगरी येथे युवकांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या सुभाषरोड येथील युवक रोहित प्रमोद वाघ याच्या निर्घृण खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा आरोपींना नाशिकरोड न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिकरोड : जेलरोड चंपानगरी येथे युवकांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या सुभाषरोड येथील युवक रोहित प्रमोद वाघ याच्या निर्घृण खून प्रकरणी अटक केलेल्या संशयित सहा आरोपींना नाशिकरोड न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखी एक अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जेलरोड मंगलमूर्तीनगर येथील चंपानगरी येथे रविवारी रात्री खुनाची घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेनंतर उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवून सोमवारी सहा संशयितांना अटक केली होती, तर एका अल्पवयीन संशयितालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित अमित गौतम वाघमारे (२७), बाळा सुरेश केदारे (१९) रा. त्रिभुवन सोसायटी, ललित प्रवीण वाघले (१९) रा. निसर्ग गोविंद सोसायटी, सागर बाळू गांगुर्डे (१८) रा. चंद्रवन सोसायटी, विशाल झुलाल जाधव (२०) रा. हरिनिवास बंगलो, समाधान सुरेश आव्हाड (१८) रा. चंद्रलिला हौसिंग सोसायटी, मंगलमूर्तीनगर जेलरोड या सहा जणांना मंगळवारी दुपारी नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता बुधवार (६ फेब्रुवारी) आठ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित फरारी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहे.
न्यायालयात मोठा बंदोबस्त
खुनाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या संशयित आरोपींना नाशिकरोड न्यायालयात मंगळवारी दुपारी आणण्यात येणार असल्यामुळे युवकांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षितेच्या कारणास्तव न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काळे बुरखे घालून आणलेल्या संशयितांना न्यायालयीन कामकाज आटोपताच पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले.