शहरात एकेका दिवसात सहा हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:30+5:302021-03-27T04:14:30+5:30
नाशिक - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आता देान हजार रुग्णसंख्या केवळ नाशिक शहरातच आढळू लागली आहे. त्या ...
नाशिक - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आता देान हजार रुग्णसंख्या केवळ नाशिक शहरातच आढळू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर काहीसे चिंतेचे वातावरण असले तरी शहरात दिवसाकाठी सुमारे सहा हजार चाचण्या करण्यात येत असून, त्यामुळेच बाधितांची संख्या वाढल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. शहरात फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नाशिक विभागाची कोरोना आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नाशिक शहरातील बाधितांची संख्या वाढत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सुटीच्या दिवशी आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यात सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० हजार किट्स खरेदी करण्यात आले आहेत. याशिवाय महापालिका आरटीपीसीआर चाचण्याही करीत आहेत. शहरातील दुकानदार, भाजी विक्रेते, रिक्षाचालक, सुरक्षारक्षक ते लोकांशी संपर्क असलेले महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे दिवसासाठी सुमारे सहा हजार चाचण्या होत आहेत. अर्थात महापालिकेची प्रयोगशाळा अद्याप कार्यान्वित नाही. मुंबईच्या हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये दोनशे चाचण्याच करता येत असल्याने अखेरीस खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जात आहे. कोरोना चाचण्या वाढविल्याने काेरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
कोट..
महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, हे खरे असले तरी सुप्त अवस्थेतील रुग्ण शोधण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना लवकर शोधल्याने अन्य व्यक्तींना होणारा संसर्ग टाळण्यावर भर दिला जात आहे.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
इन्फो...
सोमवारपासून महापालिकेची नवी लॅब
महापालिकेने बिटको रुग्णालयात काेविड चाचणी लॅब तयार केली असून, त्यात प्राथमिक चाचणीनंतर आयसीसीआरकडे नमुने पाठवून परवानगी मागण्यात आली आहे. येत्या साेमवारपासून (दि. २९) ही लॅब प्रत्यक्ष कार्यवाहीत येणार आहे.