ठाणगाव येथे सहा वर्षाचा बिबट्या जेरबंद; दहशतीतून झाली शेतकऱ्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 10:58 AM2023-05-12T10:58:22+5:302023-05-12T10:58:34+5:30
लावदरी परिसरात एक बिबटया जेरबंद झाला असला तरी आणखी एक बिबटया मुक्त असून त्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नितीन शिंदे
ठाणगाव (नाशिक): सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील लावदरी परिसरात शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबटया जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पंधरा दिवसापूर्वी लावदरी परिसरातील शेतकरी रमेश हरी पानसरे यांच्या गोठ्यातून दोन वासरे बिबटयाने ओढून ठार मारले होते पण वासरे जंगलात ओढून नेल्याने वासराचा कोणताही पुरवा नसल्याने वनविभागाच्या वतीने पंचनामा केला नाही. त्यानंतर पानसरे यांनी सदर ठिकाणी बिबटयाचा दहशत असल्याने वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली त्यानंतर लावदरी परिसरात पिंजरा लावण्यात आला. शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटच्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात अडकला त्यानंतर पानसरे यांचा मुलगा विक्रम हा शेतात गेल्या असता त्यास बिबटयाचा डरकाळ्या येऊ लागल्याने त्याला बिबटया पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले.
वनविभागाच्या वतीने वनपाल सुनिल झोपो, वनरक्षक किरण गोर्डे, पी.जी.बिन्नर,वनमंजूर भारत गांगड, काशिनाथ कातोरे,आजय गि-हे,बाळू गांगड यांनी सदर जखमी अवस्थेत असलेल्या बिबटयाला मोहदरी येथील वनउद्योनात नेण्यात आले. बिबटयाने पिंजऱ्यात असणाऱ्या तारेला ओढण्याचा प्रयत्न केल्याने व पिंजऱ्याला धडकी दिल्याने बिबटयाला तोंडाला जखम झाली असून त्यास मोहदरी येथील वनउद्योनात ठेवण्यात आले आहे पशु वैद्यकीय अधिकारी थोरात यांनी जखमी बिबटयावर उपचार करुन वनविभागाचा देखरेखीत ठेवण्यात आला आहे.
बिबटयाची दशहत अजूनही कायम
लावदरी भागात झांडाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबटयाच्या जोडीचा वावर कायम आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्याने व जंगलातील वृक्षाची पानगळ झाल्याने वन्यप्राणानां लपण्यासाठी सावली नसल्यामुळे बिबटे व अन्य वन्यप्राणी गावकुसाकडे अन्न व पाण्याच्या शोधार्थ फिरतानां दिसत आहे. लावदरी परिसरात एक बिबटया जेरबंद झाला असला तरी आणखी एक बिबटया मुक्त असून त्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.