लासलगाव येथील सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:53 PM2021-02-08T18:53:05+5:302021-02-09T00:42:55+5:30
विंचूर : गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या अनेक तक्रारी असून पाइपलाइनवर विंचूर तीन पाटी येथे आठ वर्षांपासून नाशिक- औरंगाबाद महामार्गामधोमध गळती होत आहे. सदर लीकेजद्वारे शुध्द पाण्याचा अनमोल जलसाठा वाया जात असून त्याचा लाभार्थी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
याप्रश्नी वारंवार निवेदन देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सोळा गाव पाणी योजना समितीच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना विंचूर येथील तीन पाटी भागातील पाणी लीकेज प्रत्यक्ष दाखवून लासलगावी नागरिकांना आठ-दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या हालअपेष्टा थांबविण्याची मागणीचे निवेदन दिले. लीकेजद्वारे पिण्याच्या शुध्द पाण्याचा अनमोल जलसाठा वाया जात असून त्याचा लाभार्थी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. लीकेजचा गैरफायदा घेऊन समितीच्या अध्यक्ष, सचिव यांच्याशी संगनमत करून तेथील काही नागरिकांनी शुद्ध पिण्याचे पाणी चार इंची पाइपलाइन करून तेथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळा येथील विहिरीत टाकून पाणी चोरण्याचे काम काही नागरिक करत असल्याचे पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. या योजनेतील गावांना आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी येत नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात समितीच्या कारभारास वैतागले आहेत. वीस इंची पाइपलाइनमधून फिल्टर प्लांटमधून लासलगावकडे येणारे लोखंडी पाइपलाइन लिकेजच्या माध्यमातून चार इंची पाईपलाइनमधून दररोज शेकडो लीटर पाणी समितीच्या संगनमताने काही नागरिक पाणी चोरण्याचे काम राजरोजपणे करीत आहेत. यावेळी नामकोचे संचालक प्रवीण कदम, व्यापारी अनिल अब्बड, शिवसेना पदाधिकारी मिलिंद निकम, राहुल कापसे, अंकुश गरुड, भूषण वाळेकर, दत्तू कुमावत, शरद रोटे, सद्दाम शेख, संकेत जगताप, युवा सेनेचे गणेश कुलकर्णी, प्रमोद धंद्रे, भावेश शिरसाठ ,अक्षय जगताप, विशाल जोशी, योगेश तिपायले, तुषार कापसे यांसह नागरिक संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाण्याची चोरी होत आहे. बेकायदा पाणी चोरीची तत्काळ चौकशी करण्यात यावी,सदर नमूद चोरी लिकेज व संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांचे वर गुन्हा दाखल करावा, अन्यथा दहा दिवसात नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील व शहर प्रमुख प्रमोद बबनराव पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेना संपर्कमंत्री दादा भुसे ,ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री अर्षद मुश्रीफ , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.