सोळा वर्षांची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:00 PM2019-09-10T23:00:39+5:302019-09-10T23:00:58+5:30
देवळा : तालुक्यातील कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाला गत सहा वर्षांत तीन तालुकास्तरीय व दोन वेळा ग्रामीण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. देवळा तालुक्यात ७० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, २० गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.
संजय देवरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यातील कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाला गत सहा वर्षांत तीन तालुकास्तरीय व दोन वेळा ग्रामीण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. देवळा तालुक्यात ७० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, २० गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.
कनकापूर येथे १६ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते स्व. भिका शिंदे यांनी गावातील दिनकर मोहिते, योगेश गांगुर्डे, भारत मोहिते या युवकांच्या मदतीने गावाची एकजूट अबाधित राहावी या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना मांडली व श्रीकृष्ण मित्रमंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विविध उपक्रम राबवित गणेशोत्सव साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी मंडळामार्फत वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यातील कौतुकास्पद गोष्ट म्हणजे गणपती आरतीचा मान हा गावातील
सर्व जातिधर्माच्या लोकांना दिला जातो. गणेशोत्सव काळात येणाऱ्या मोहरम सणाच्या दिवशी गावातील मुस्लीम जोडप्याला गणेश पूजनाचा मान दिला जातो. त्यातून सामाजिक एकता व बांधिलकी जोपासण्याचे काम केले जाते. तसेच मंडळाकडून कायम पर्यावरणपूरक काम केले
जाते. ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अवयवदान जनजागृती, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्हॉलीबॉल, कबड्डीसारख्या मैदानी खेळांच्या स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान यांसारखे समाजोपयोगी उपक्र म राबविले जात आहेत.
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस विभागामार्फत सन २०१८ मध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना राबविण्यात आली होती. कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाने भाग घेतला होता. या मंडळाने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. याची पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दखल घेऊन या मंडळाची जिल्हास्तरावर निवड करून ग्रामीण भागातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.
गावात एकजूट कायम राहावी या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना सोळा वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यावर्षी वडाच्या झाडावर लाकडी भुशाच्या मदतीने पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. विविध पर्यावरणपूरक उपक्र म राबविण्यात येत असल्यामुळे सर्व स्तरांतून सतत प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे कामाचा उत्साह वाढतो. यावर्षी मंडळातर्फेकांचणे, कनकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळेला तीन संगणक भेट देणार आहोत.
- जगदीश शिंदे
अध्यक्ष, श्रीकृष्ण मंडळ, कनकापूर